पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारल्यानंतर ममता बॅनर्जींनी पहिल्यांदाच भेट घेतली. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

“याआधी जेव्हा मी दिल्लीला येत असे तेव्हा नेहमी गृहमंत्रीपदी असणाऱ्या राजनाथ सिंह यांची भेट घेत असे. त्यामुळेच सदिच्छा भेट म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यास मी इच्छुक आहे. जर त्यांनी वेळ दिला तर नक्की भेट घेईन,” असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.

ममता बॅनर्जी दिन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. बुधवारी ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींना बिरभूम येथील कोळसा खाण प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण दिलं. नरेंद्र मोदींच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या या भेटीत दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या या भेटीत ममता बॅनर्जी यांनी त्यांनी कुर्ता आणि मिठाई भेट म्हणून दिली.

यावेळी राजकीय चर्चा झाली नसून पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला असं ठेवा अशी मागणी मोदींकडे केली. आपण यासंबंधी नक्की विचार करु असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवरात्रीनंतर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर या असं निमंत्रणही दिलं.