विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं आहे. आज सकाळीच त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या.

विधानसभा निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्यावरुन भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरु होतं. आता त्यावर ममता बॅनर्जी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणतात, “अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाही. जिथे भाजपा जिंकलं आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भाजपा जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केलं आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे”.

आणखी वाचा- तृणमूलच्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी ४०० कार्यकर्ते आसामध्ये आल्याचा भाजपा नेत्याचा दावा

पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान-राज्यपाल चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचाराबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे राज्यपालांनी सांगितले.