काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे प्रतिज्ञापत्र पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या विजयी आमदारांकडून घेण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी १०० रुपये किमतीच्या स्टॅम्पपेपरवर आमदारांकडून लेखी निर्वाळा घेतला असून त्याला ‘प्रतिज्ञा’ असे संबोधले आहे. हा वेठबिगारीचा प्रकार असल्याचे अनेक आमदारांनी खासगीत म्हटले आहे. सदर टू-जी (दोन गांधी) जुगार पक्षांतर थोपवेल का, असा सवाल विचारला जात आहे.
पश्चिम बंगालमधील सत्तारूढ पक्षात आमदारांनी जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ही प्रतिज्ञा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा विचार करता त्यांच्या जागांमध्ये या वेळी वाढ झाली असून मतदानाची टक्केवारीही वाढली आहे.
काँग्रेसचे आठ आमदार अत्यल्प बहुमताने विजयी झाले असून राज्यातील नेतृत्वाला त्यांच्याबद्दल खात्री वाटत नाही. यापैकी एक आमदार केवळ ८९१ मतांनी विजयी झालेला आहे.