पश्चिम बंगालमधील दोन कनिष्ठ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने आता जोर पकडला आहे. शुक्रवारी पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या आंदोलनाला अन्य राज्यातील डॉक्टरांचेही समर्थन मिळाले. त्यानंतर दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमधील आरोग्यसेवांवर त्याचा परिणाम झाला होता. याच हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील तब्बल 700 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिला आहेत.

सहकारी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतरही पश्चिम बंगाल सरकारकडून कोणत्याही कारवाईचे ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे सांगत तब्बल 700 सरकारी डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितल्यानंतरच आपण कामावर रूजू होणार असल्याची अट डॉक्टरांकडून घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे एम्समधील डॉक्टरांच्या संघटनेनेही ममता बॅनर्जी यांना अल्टीमेटम दिले आहे. दोन दिवसांमध्ये डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास एम्समधील डॉक्टरही अनिश्चित कालावधीसाठी संपावर जातील, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी परिस्थिती थोडी बदलल्याचे दिसून आले. तृणमूलचे नेते पार्थ चटर्जी आणि फिरहाद हाकिम यांनी डॉक्टरांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी आपण ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती दिली. मी ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी माझ्याशी संपर्क केल्या यावर आम्ही चर्चा करू, असे ट्विटही त्यांनी केले आहे.