डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये अद्यापही डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितल्यानंतरच आंदोलन मागे घेणार असल्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे. अशातच शुक्रवारी डॉक्टरांकडून माणुसकीचे दर्शन घडले, ज्याचे सर्वच स्तरातून आता कौतुक होत आहे. आदोलनादरम्यान, डॉक्टरांनी एका महिलेची प्रसुती करत आपले कर्तव्य पार पाडले आहे.

शुक्रवारी सकाळी पूजा नामक महिलेला प्रसुती कळा सुरू होत्या. परंतु डॉक्टरांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान त्यांना रूग्णालयात कसे दाखल करायचे असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला. परंतु अन्य पर्याय नसल्याने त्यांनी कुटुंबीयांनी पूजा यांना आरजी रूग्णालयात नेले. सुरूवातीला डॉक्टरांनी त्यांना अन्य रूग्णालयात हलवण्यास सांगितले. परंतु पूजा यांची स्थिती पाहता डॉक्टरांनी त्यांना रूग्णालयात दाखल करून घेत प्रसुती केली. पूजा यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

प्रसुतीनंतर पूजा यांनी डॉक्टरांचे आभार मानले. रूग्णालयात येताना प्रसुती कळांमुळे आपल्याला काहीतरी होईल, अशी भिती मनात होती. डॉक्टर माझ्या मदतीला धावून आले त्यावेळी मी सुटकेच्या नि:श्वास टाकला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आम्ही सदर महिलेच्या कुटुंबीयांना संपावर असल्याचे सांगणार होतो. परंतु आम्ही त्यांना प्रसुती कळा येत असताना पहिले. त्यानंतरही आम्ही परत पाठवले असते, तर तो माणुसकीचा अपमान ठरला असता, अशी डॉक्टरांकडून सांगण्यात आले.