पश्चिम बंगालमध्ये २०१६च्या निवडणुकांमध्ये झालेली पीछेहाट भरून काढण्यासाठी भाजपानं यंदा कंबर कसली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी निवडणुका जाहीर होण्याच्याही काही महिने आधीपासून भाजपानं तयारी सुरू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पश्चिम बंगालमध्ये दौरे देखील झाले होते. आता प्रचारासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये काही सभा घेणार आहेत. मात्र, भाजपाच्या केंद्रीय टीमने जरी जोरदार तयारी केली असली, तरी अजूनपर्यंत भाजपाला मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा ठरवता आलेला नाही. यासाठी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली, यांच्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात असलं, तरी ती देखील नुसतीच चर्चा असल्यामुळे सध्यातरी पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी विरूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असाच ‘प्रचारसामना’ दिसत आहे.

भाजपा काँटे की टक्कर देणार?

२०१६मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता दीदींच्या विजयी वारूसमोर भाजपाचा मोठा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपाला फक्त ३ जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र, त्यानंतर झालेल्या २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपानं कमबॅक करत पश्चिम बंगालमधून १८ आमदार निवडून आणले. त्यामुळे देश पातळीवर दमदार कामगिरी झाल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपानं तृणमूल काँग्रेसला काँटे की टक्कर द्यायच्या तयारीनेच कंबर कसली आहे.

सौरव गांगुली भाजपात जाणार?

निवडणुका जाहीर होताच भाजपानं पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभांचा जोरदार धडाका लावला आहे. मात्र, असं असलं, तरी अद्याप त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काही ठरवता आलेला नाही. मात्र, भाजपाकडे अनेक उमेदवार असल्याचं सांगितलं जात आहे. या यादीमध्ये सर्वात वरचं नाव सौरव गांगुली यांचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी प्रचारसभेमध्ये सौरव गांगुली भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, भाजपाच्या पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्षांनीच असं काही नसल्याचं सांगितलं आहे. शिवाय, सौरव गांगुली यांनीही राजकारणात यायची इच्छा नसल्याचं याआधी एकदा स्पष्ट केलं आहे. त्याुळे त्यांच्या भाजपा प्रवेशावर प्रश्नचिन्ह आहेच.

सौरव गांगुली यांच्यासोबतच भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष आणि आरएसएसचे माजी प्रचारक दिलीप घोष, मेघालयचे माजी राज्यपाल तथागता रॉय, राज्यसभा सदस्य स्वपन दासगुप्ता, आरएसएसचे सदस्य जिष्णू बासू अशी काही नावं देखील चर्चेमध्ये आहेत. मात्र, अद्याप यापैकी एकही नाव भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी म्हणून पुढे करण्यात आलेलं नाही.

काय सांगते आकडेवारी?

पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी ८ टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यात पहिल्या टप्प्यासाठी २७ मार्च रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. २ मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. विद्यमान पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे २११ सदस्य, भाजपाचे ३, भाकपाचे १, माकपाचे २६, काँग्रेसचे ४४, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे २, गोरखा मुक्ती मोर्चाचे ३, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे ३ तर एक अपक्ष आमदार आहेत.