News Flash

“निवडणूक आयोगाने मदत केली नसती, तर भाजपाला ५० जागाही जिंकता आल्या नसत्या”

ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. (संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यात लक्षवेधी ठरली पश्चिम बंगालची निवडणूक. भाजपा संपूर्ण ताकद पणाला लावल्याने बंगालच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं होतं. पण मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपाला मात देत सलग तिसऱ्यांदा मोठा विजय मिळवला. या विजयानंतर बोलताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोगाने भाजपा प्रवक्त्यासारखं काम केलं. यावेळी आयोग ज्या पद्धतीने वागला, ते सगळं भयंकर होतं,” असं म्हणत ममतांनी टीकास्त्र डागलं.

पश्चिम बंगालमधील निकालानंतर इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या,”मला विश्वास होता की आम्ही दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकू. २२१ जागा जिंकण्याचं आमचं लक्ष्य होतं. पण यावेळी निवडणूक निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागला, ते भयंकर होतं. निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने भाजपा प्रवक्त्यासारखं काम केलं,” असा आरोप ममतांनी केला.

“सुरुवातीपासूनच मी सांगत आले आहे की, आम्ही दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकू आणि भाजपाला ७० जागांच्या पुढे जाता येणार नाही. जर निवडणूक आयोगाने त्यांना (भाजपा) मदत केली नसती, तर भाजपाला ५० जागाही जिंकता आल्या नसत्या. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन छेडछाड केलेल्या होत्या. आणि असंख्य पोस्टल बॅलेट रद्द करण्यात आले. पण, मी पश्चिम बंगाल माणसांना सलाम करते. त्यांनी फक्त बंगाललाच वाचवलं नाही, तर देशालासुद्धा वाचवलं आहे,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

कडव्या झुंजीचा अंदाज ठरला फौल

संपूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालच्या निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेरसने धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ताशिखर गाठले. बंगालमध्ये भाजप तृणमूल काँग्रेसला कडवी लढत देईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनीही वर्तवला होता. मात्र, मतमोजणी सुरू होताच हा अंदाज खोटा ठरवत तृणमूल काँगे्रसने मारलेली मुसंडी अखेरपर्यंत कायम राखली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 8:51 am

Web Title: west bengal election result mamata banerjee reaction bjp would not have crossed even 50 seats without election commission help bmh 90
Next Stories
1 करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘राष्ट्रीय लॉकडाउन’चा विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला सल्ला
2 काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान
3 बंगालमध्ये ममताच!
Just Now!
X