पश्चिम बंगालमध्ये भाजपा विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी लढत होताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने सर्वप्रथमच इतकं लक्ष घातलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालमधील प्रचार मोहिमेवर बारीक नजर ठेवून आहेत. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामाही प्रसिद्ध केला असून, या जाहीरनाम्यावरून भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

आठ टप्प्यात मतदान होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वस्व पणाला लावले आहे. तर दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी ममता बॅनर्जीही जीवाचे रान करताना दिसत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेचीही एकही संधी सोडत नसल्याचं चित्र असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घरचा आहेर दिला आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. अमित शाह यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्याने स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रसिद्ध केला, हे आश्चर्यच आहे. यातून चुकीचा संदेश जाणार असून, यातून भाजपाच्या निवडणूक मोहिमेला धक्का बसेल. पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षांच्या हस्तेच जाहीरनामा प्रसिद्ध करायला हवा होता,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

कसला ब्रॅण्ड?

स्वामी यांच्या ट्विटवर एकाने भाजपा ब्रॅण्ड तयार करण्याचं काम करत असल्याचं म्हटलं. त्यावर बोलताना स्वामी म्हणाले,”कसला ब्रॅण्ड? लोकांकडून नेत्याचा आदर त्यांच्या पदामुळे केला जात नाही. तर त्यांनी लोकांसाठी आणि देशासाठी केलेल्या कामामुळे केला जातो. महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण कोणत्याही पदावर नव्हते. तरीही त्यांचं सामाजिक आणि राष्ट्रासाठी केलेलं काम लोकाना प्रेरणा देते. तेच स्वामी विवेकानंदांच्या बाबतीतही आहे,” असं उत्तर स्वामी यांनी दिलं आहे.