पश्चिम बंगालमध्य आज ४४ जागांसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मात्र, यादरम्यान हिंसाचाराच्या दोन घटनांमुळे मतदान प्रक्रियेला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे. या प्रकारानंतर पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध केला आहे. पश्चिम बंगालच्या कूच बेहर (Cooch Behar) जिल्ह्यातल्या सितालकुची भागामध्ये हा प्रकार घडला. मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन नावाच्या एका तरुण मतदारावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडली. या घटनेमध्ये आनंद बर्मनचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकारानंतर सितालकुचीमध्येच १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारामध्ये ४ जणांचा दुपारच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित मतदान केंद्रावरील मतदान थांबवण्यात आलं होतं.

नेमकं घडलं काय?

पश्चिम बंगालमध्ये ४४ जागांसाठी आज सकाळी मतदान सुरू झालं. मात्र, सकाळच्या सुमारासच सितालकुची भागातल्या एका मतदान केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन नावाच्या युवकावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल झाले आणि तिथेच त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. काही वेळानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवलं.

दुपारी घडली दुसरी घटना!

सकाळी हा प्रकार घडल्यानंतर सितालकुची भागामध्येच असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १२६ वर पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगून देखील जमाव ऐकत नव्हता. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय सुरक्षा पथकाच्या जवानांवरची शस्त्र हिसकावून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न जमावातील काहींनी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाईलाजाने स्वसुरक्षेसाठी आक्रमक झालेल्या व्यक्तींवर जवानांना गोळीबार करावा लागला. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला.

 

दरम्यान, सीआरपीएफच्या गोळीबारात मृत्यू झालेले ४ जण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते असा दावा आता तृणमूलकडून केला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा निषेध करत भाजपावर टीका केली आहे. “सीआरपीएफने आज सितालकुची (Cooch Behar) मध्ये ४ जणांवर गोळी झाडली. सकाळी देखील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सीआरपीएफ माझी शत्रू नाही. पण गृहमंत्र्यांच्या निर्देशांवरून एक कट शिजवला जातो आहे. आणि आज घडलेली घटना त्याचा पुरावा आहे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

 

“कूच बेहरमधील त्या मतदारसंघातले सामान्य नागरिक भाजपाच्या गुंडांना मतदानात गोंधळ घालण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून गोळीबार झाला. त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफची फूस होती. गृहमंत्र्यांच्या निर्देशांनुसार हा कट केला जात आहे. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत”, असा आरोप तृणमूलचे खासदार सौगता रॉय यांनी केला आहे.