पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंग भरू लागले आहे. निवडणूक जवळ येत असतानाच दुसरीकडे भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये भरतीही सुरू आहे. अनेक नेत्यांनी आतापर्यंत पक्षांतर केली असून, अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी हिनेही सोमवारी (१ मार्च) भाजपात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच श्राबंती चॅटर्जीने भाजपात प्रवेश करण्यामागील भूमिका मांडली.

ममता बॅनर्जी आणि भाजपा प्रवेशावर बोलताना श्राबंती म्हणाली, “मला तृणमूल काँग्रेसमधून कोणताही प्रस्ताव आला नाही. हा, मी दीदींचा (ममता बॅनर्जी) आदर करते. दीदींसोबत मी एकाच व्यासपीठावर राहिली आहे. त्यांच्यासोबत प्रचारसाठीही गेलेय, पण मला भाजपाची विचारधारा प्रभावित करते. मला पंतप्रधान मोदींचे व्हिजन प्रभावित करते,” असं श्राबंती म्हणाली.

आणखी वाचा- शिवसेनेची ‘ममतां’ना साथ! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतला मोठा निर्णय

आणखी वाचा- पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा; निवडणूक आयोगाचा आदेश

श्राबंती चॅटर्जी हिने भाजपात प्रवेश करत पश्चिम बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे. भाजपा प्रवेशाच्या निर्णयावर बोलताना चॅटर्जी म्हणाली,”पश्चिम बंगालमध्ये ३४ वर्षे डाव्या पक्षाने आणि १० वर्ष तृणमूल काँग्रेसनं सत्ता चालवली आहे. पण जितका विकास बंगालमध्ये व्हायला हवा होता, तितका तो झालेला नाही. मला वाटत आमच्या ‘सोनार बाग्ला’चा विकास व्हायला हवा. त्यामुळे मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे,” असं श्राबंती म्हणाली.