• भाजपचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा सत्ता; डावे-काँगे्रसला खाते उघडण्यातही अपयश
  • आसाममध्ये भाजप, केरळमध्ये  डाव्यांना सत्ता राखण्यात यश
  • तमिळनाडूत द्रमुक,पुदुच्चेरीमध्ये ‘एनडीए’ची सत्ता

 

संपूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालच्या निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेरसने धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ताशिखर गाठले. पश्चिम बंगालप्रमाणेच आसाम आणि केरळमध्ये मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिला. तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये मात्र सत्तांतर झाले.

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका आणि देशातील पोटनिवडणुकांची मतमोजणी रविवारी झाली. करोना प्रतिबंधक नियमांच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून संथगतीने मतमोजणी सुरू होती. तब्बल आठ टप्प्यांत मतदान पार पाडलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदींच्या झंझावाती प्रचाराचे केंद्र ठरलेल्या बंगालच्या निकालाबाबत सर्वांची  उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बंगालमध्ये भाजप तृणमूल काँगे्रसला कडवी लढत देईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनीही वर्तवला होता. मात्र, मतमोजणी सुरू होताच हा अंदाज खोटा ठरवत तृणमूल काँगे्रसने मारलेली मुसंडी अखेरपर्यंत कायम राखली.

अखेरचे कल हाती आले तेव्हा तृणमूल काँग्रेसने १८९ जागांवर विजय मिळवला होता, तर अन्य २५ जागांवर पक्ष आघाडीवर होता. भाजपने ६३ जागांवर विजय मिळवला, तर १३ जागांवर पक्ष आघाडीवर होता. गेल्या विधानसभा निवडणुकीतील तीन जागांवरून यावेळी भाजपने मोठी मुसंडी मारली असली तरी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला फटका बसला आहे. निकालाची उत्कंठा वाढविणाऱ्या नंदीग्राम मतदारसंघात मात्र ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला. राज्यभरात मात्र ममतालाटेत प्रतिस्पध्र्यांचा धुव्वा उडाला. एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये डाव्यांसह काँग्रेसची धूळधाण उडाली. या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आले नाही. भाजप विरुद्ध तृणमूल काँगे्रस या थेट लढतीत मतदारांनी ममतांच्या पारड्यात भरघोस मते टाकल्याचे स्पष्ट झाले.

आसाममध्ये मात्र भाजपने सत्ता राखली. राज्यात भाजप ४४ जागा जिंकत १५ जागांवर आघाडीवर होता. आसाम गण परिषदेने नऊ जागा जिंकल्या. काँग्रेस १८ जागा जिंकत ११ जागांवर आघाडीवर होते. केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळविण्याची लक्षणीय कामगिरी डाव्यांनी केली. माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीएफ) सहजपणे बहुमत मिळवले. मुख्यमंत्री पी. विजयन यांना विजयाचे श्रेय दिले जाते. त्यामुळे केरळमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याचे काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे स्वप्न भंगले. निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवलेले ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांना पराभव पत्करावा लागला.

तमिळनाडूमध्ये मात्र मतदारांनी सत्तांतराला कौल दिला. द्रमुक-काँगे्रस आघाडीने राज्यात अपेक्षेप्रमाणे अण्णाद्रमुककडून सत्ता खेचून आणली. अण्णाद्रमुकशी युती करून तमिळनाडूच्या आखाड्यात उतरलेल्या भाजपला फारसे यश मिळू शकले नाही. भाजपला केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले.

पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत एन. आर. काँग्रेस-भाजप आघाडीला बहुमत मिळाले. गेली पाच वर्षे सत्ता भूषविलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला. केंद्रशासित पुदुच्चेरी विधानसभेच्या ३० पैकी १६ जागा एन. आर. काँग्रेस -भाजप आघाडीने जिंकल्या. द्रमुक-काँग्रेस आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसमधील नाराजांना गळाला लावून पक्ष वाढविण्याचा प्रयत्न के लेल्या भाजपला सहा जागा मिळाल्या.

नंदीग्राममध्ये पराभव

ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले. तृणमूलचे बंडखोर नेते व भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी १,७३६ मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.

पंतप्रधानांकडून ममता, विजयन, स्टॅलिन यांचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतील यशाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि द्रमुक नेते स्टॅलिन यांचे अभिनंदन केले. स्थानिक जनतेच्या आकाक्षांपूर्तीसाठी आणि करोनाविरोधी लढण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही पंतप्रधानांनी या नेत्यांना ट्विटद्वारे दिली.

पंढरपूर भाजपकडे

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३७३३ मतांनी पराभव केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजप अशी प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपने बाजी मारली. निवडणुकीचे केलेले सूक्ष्म नियोजन आणि प्रशांत परिचारक आणि आवताडे गटाचे मनोमीलन यामुळे भाजपचा हा विजय साकार झाला आहे.

बेळगावमध्ये भाजपचा निसटता विजय

कोल्हापूर : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निसटता विजय संपादन करीत भाजपने हा मतदारसंघ कायम राखला. भाजप उमेदवार मंगला अंगाडी यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा पाच हजार मतांनी पराभव के ला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके  यांना सव्वा लाखांच्या आसपास मते मिळाली.

हा बंगालचा, बंगाली जनतेचा विजय आहे. भाजपने घाणेरडे राजकारण केले. निवडणूक आयोगानेही भाजपच्या प्रवक्त्यासारखी भूमिका बजावली, पण सर्व शक्ती पणालाही लावूनही भाजपचा पराभव झाला. बंगालने देशाला वाचवले, याचा मला अभिमान आहे.        – ममता बॅनर्जी