पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल विरुद्ध तृणमूल काँग्रेस हा वाद काय नविन नाही. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता राज्यपाल जगदीप धनखर आणि तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. खासदार महुआ मोइत्रा यांनी केलेले आरोपी राज्यपाल जगदीप धनखर यांनी फेटाळून लावले आहेत. राजभवनातील विशेष अधिकारी पदांवर आपले कुटुंबिय आणि ओळखीच्या लोकांना नियुक्त केल्याचा आरोप खासदार महुआ मोइत्रा यांनी केला होता. या आरोपांवर राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर राज्यातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न लपवण्यासाठी असे आरोप केले जात असल्याची टीकाही केली आहे.

” महुआ मोइत्रा यांनी ट्विटर आणि मीडियात विशेष अधिकारी पदावरील सहा अधिकारी माझे नातेवाईक आहेत, हे सांगणं चुकीचं आहे. ओएसडीत तीन वेगवेगळ्या राज्यांचे आणि चार वेगवेगळ्या जातीचे प्रतिनिधी ठेवले जातात. त्यात कुणीही जवळचं नातेवाईक नाही. यातील चार माझ्या जातीतील आणि राज्यातील नाहीत”, असं ट्वीट राज्यपाल जगदीप धनखर यांनी केलं आहे.

आणखी वाचा- West Bengal: ताडपत्री चोरल्याच्या आरोपाखाली भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी एक ट्वीट रविवारी केलं होतं. त्यात त्यांनी राजभवनातील विशेष अधिकारी नियुक्तीवरून टीका केली होती. ‘अंकल जी’ असं संबोधन करत त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि ओळखीचे लोकं राजभवनात कसे नियुक्त केले?, असा प्रश्न उपस्थित केला होता. या यादीत राज्यपालांचे ओएसडी- अभ्युदय शेखावत, ओएसडी समन्वय- अखिल चौधरी, ओएसडी प्रशासन- रुचि दुबे, ओएसडी प्रोटोकॉल- प्रशांत दीक्षित, ओएसडी आयटी- कौस्तव एस वलिकर आणि नव नियुक्त ओएसडी- किशन धनखर यांचं नाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील वाद शिगेला गेला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर टीकेची झो़ड उठवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.