पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मृत्यूवरुन तणाव निर्माण झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जी सरकारविरोधात निदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. बिरभूम जिल्ह्यात काही लोकांनी स्वरुप घोराई यांच्यावर हल्ला केला असल्याचा भाजपाचा आरोप आहे. जखमी अवस्थेत स्वरुप यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

भाजपाकडून आरोप करण्यात आला आहे की, कार्यकर्त्यांना स्वरुप यांचा मृतदेह मुख्यालयात घेऊन जायचा होता आणि तिथून अंत्ययात्रा काढायची होती. पण पोलिसांनी यासाठी परवानगी दिली नाही. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं पोलिसांनी सांगितल्याचा दावा भाजपाने केला आहे.

पोलिसांनी स्वरुप यांचा मृतदेह रुग्णालयातून थेट त्यांच्या घरी नेऊ असा पर्याय दिला होता. मात्र त्यांचे कुटुंबीय आणि भाजपा यांनी यासाठी नकार दिली. अखेर पोलिसांनी मृतदेह बिरभूम येथे त्यांच्या घरी पाठवला. पोलिसांनी जेव्हा मृतदेह पाठवला तेव्हा सोबत पोलीस सुरक्षा असल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा संताप झाला.

आमच्या संमतीविना पोलीस मृतदेह घरी कसे पाठवू शकतात अशी विचारणा कुटुंबीयांनी केली आहे. आपण परवानगी न दिल्याने पोलिसांनी मृतदेह चोरी केल्याचा आरोपी कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी आता कोलकाता पोलीस आणि एनआरएस रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपादेखील याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.