News Flash

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, पश्चिम बंगालमध्ये एकदिवस आधीच बंद होणार प्रचार

निवडणूक कालावधीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचार पाहता निवडणूक आयोगाने प्रचार कालावधी 20 तासांनी कमी केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रचार कालावधी कमी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 19 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री 10 नंतर निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

निवडणूक कालावधीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचार पाहता निवडणूक आयोगाने प्रचार कालावधी 20 तासांनी कमी केला आहे. त्यामुळे गुरूवारी रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तसेच हिंसाचारासंबंधी कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

तसेच पश्चिम बंगालच्या गृह सचिवांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. मुख्य सचिवांकडे या खात्याचा पदभार सोपवण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकांपूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक प्रचाराचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या दमदम, बरसात, बसीरहाट, जयनगर, मथुरापुर, जादवपुर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या जागांवरील प्रचार गुरूवारी रात्री 10 वाजता संपणार असल्याची माहिती निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार यांनी दिली. तसेच देशात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाकडून कलम 324 चा वापर करण्यात आला आहे.

या कलमाचा पहिल्यांदा वापर केला असला तरी शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यामध्ये हिंसाचार किंवा कायद्याच्या उल्लंघनासारखे प्रकार घडल्यास याचा पुन्हा वापर करण्यात येऊ शकतो, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्रीवरही बंदी घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 8:07 pm

Web Title: west bengal lok sabha election campaign will stop tomorrow election commission
Next Stories
1 पाकिस्तानची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंदच
2 अभिनंदन यांच्या शौर्याला युनिटकडून अनोखा ‘सलाम’
3 काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत भाजपा समर्थकाचे वंदे मातरमचे नारे
Just Now!
X