पश्चिम बंगालमधील निकालाने भाजपाचा पराभव होऊ शकतो हे सिद्ध झालं असून लोकांनी मार्ग दाखवला आहे असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील जबरदस्त विजयानंतर एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. त्यांना राजकीय ऑक्सिजनची गरज असल्याचा टोला ममता बॅनर्जी यांनी यावेळी लगावला. तसंच पश्चिम बंगालमधील हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जबाबदार धरत ही पराभवानंतर उमटलेली प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं आहे.

“हे त्यांचंच बाळ आहे. त्यांनी परिस्थिती बिघडवली आहे. हिंसाचाराच्या काही तुरळक घटना घडल्या असून योग्यप्रकारे हाताळल्या जातील. निवडणुकीनंतर प्रत्येक राज्यात अशा घटना होत असतात. मला कोणताही हिंसाचार नको आहे. लाजिरवाण्या पराभवानंतर भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. आपण आपल्या समर्थकांना घरातच थांबण्यास सांगितलं असून विजय साजरा न करण्याचं आवाहन केलं असल्याचं त्या म्हणाल्या.

“त्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. आतापर्यंत केंद्रीय यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था हाताळत होत्या, मी नाही. त्यामुळे ही त्यांची करणी असून परिस्थती बिघडवण्यासाठी त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे,” असं ममता बॅनर्जींनी सांगितलं.

“भाजपाचा पराभव केला जाऊ शकतो. अखेर आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकांची निवड महत्वाची आहे. लोकांनी मार्ग दाखवला आहे. लोकशाहीत तुम्ही अहंकार दाखवता कामा नये. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी राजधर्माचं पालन करावं आणि फक्त भाजपाच नाही तर सर्व पक्षांना पाठिंबा द्यावा,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. भाजपासोबत लढण्यासाठी लोकांना एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.

“अशा प्रकारचं यंत्रणा राजकारण (सीबीआय, ईडीचा वापर) संपलं पाहिजे आणि हा नरेंद्र मोदी-अमित शाह राजकारणाच्या युगाचा शेवट असेल. भाजपाच्या जुन्या सदस्यांनीही मोदी-अमित शाह यांच्या राजकारणाची पद्धत नाकारली आहे. देश अशा पद्दतीचं राजकारण सहन करु शकत नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापेक्षाही चांगले अनेक उमेदवार आहेत,” असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी यावेळी २०२४ मध्ये नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून आव्हान देण्याच्या प्रश्नावरही उत्तर दिलं. “अनेकदा तुम्ही त्या क्षणी सगळं ठरवू शकत नाही. निवडणुकीच्या वेळी गोष्टी वेगळ्या असतात. एक किमान समान कार्यक्रम गरजेचा आहे. पण सध्या करोनाविरोधातील लढाई सुरु असून ही लढाई संपल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. आम्ही तज्ञांची एक टीम तयार करु जी मार्गदर्शन करेल. देश ही आपत्ती सहन करु शकत नसल्याने आपोआप ते पुढे येईल. ही भाजपा म्हणजे आपत्ती आहे,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली. ममता बॅनर्जी यांनी यावेळी लोकांमुळे आपला विजय झाल्याचं सांगत लोकांना श्रेय दिलं.