पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकी अगोदर तृणमूल काँग्रेसला हादरे बसणं सुरूच आहे. अगोदरच अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली असताना, आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील क्रीडामंत्री व माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे.

लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मंत्रीपदाचा जरी राजीनामा दिला असला, तरी ते अद्याप टीएमसीचेच आमदार आहेत. मात्र असे जरी असले तरी त्यांनी हावडा टीएमसी जिल्हाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला असल्याने, भविष्यात ते टीएमसीला सोडचिठ्ठी देणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

तर, लक्ष्मी रतन शुक्ला यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणीही राजीनामा देऊ शकतं. लक्ष्मी रतन शुक्ला यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे की, त्यांना खेळासाठी जास्त वेळ द्यायचा आहे व ते आमदार म्हणून कार्यरत राहतील. त्यामुळे कुणीही त्यांच्या राजीनाम्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नये.” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता सरकारला धक्के सुरूच; बडा नेता ५,००० कार्यकर्त्यांसह भाजपात होणार दाखल

लक्ष्मी रतन शुक्ला हे भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये देखील कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स व सनराइजर्स हैदराबादकडून ते खेळले आहेत.

पश्चिम बंगालचे माजी परिवहन मंत्री सुवेंदु अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर गेले काही दिवस तृणमूलमधील विविध नेते भाजपात प्रवेश करताना दिसत आहेत.