पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अजून एक धक्का बसला आहे. एकीकडे ममता बॅनर्जी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करत असताना दुसरीकडे बंडखोर नेत्यांचा सामना करावा लागत आहे. पक्ष सोडून जायचं असेल तर त्यांनी बिनधास्त जावे असे खडे बोल त्यांनी सुनावल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील अजून एका नेत्याने राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. रजीब बॅनर्जी यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण दिलेलं नाही.

रजीब बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींना पत्र पाठवून राजीनाम्याची माहिती दिली आहे. राज्य सरकारमधून राजीनामा देणारे रजीब बॅनर्जी तिसरे मंत्री आहेत. “मला आपणास कळवताना खेद होतो आहे की, मी आज २२ जानेवारी २०२१ रोजी वनमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे,” असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

आणखी वाचा- पश्चिम बंगाल – भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोण असणार?; विजयवर्गीय यांनी दिलं उत्तर

रजीब बॅनर्जी यांनी पक्षातील काही नेते आपल्याविरोधात प्रचार करत असल्याची तक्रार केल्याच्या दुसऱ्या दिवशीच राजीनामा दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी सरकार आणि पक्षाच्या विरोधात अनेकदा अप्रत्यक्षपणे टीका केली होती. टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी त्यांच्यासोबत चर्चादेखील केली होती.

“पक्षातील काही नेते कार्यकर्त्यांचं शोषण करत आहेत. काही कार्यकर्त्यांचा वापर करत माझ्याविरोधात खोटा प्रचार केला जात आहे,” असं रजीब बॅनर्जी यांनी १६ जानेवारीला झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं होतं. यावेळी त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं.

आणखी वाचा- ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का!, आमदार अरिंदम भट्टाचार्य भाजपात जाणार

डिसेंबर महिन्यात पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. तर ५ जानेवारी रोजी राज्य क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी आमदारकी किंवा पक्षातून राजीनामा दिलेला नाही.