पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात ५६ मतदारसंघांमध्ये ८० टक्के मतदान झाले. काही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या.

अलिपूरद्वार, जलपैगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, माल्दा व बीरभूम या जिल्ह्य़ांमध्ये हे मतदान झाले. नक्षलग्रस्त बीरभूममधील ७ मतदारसंघांमध्ये मतदान लवकरच, म्हणजे दुपारी ४ वाजता संपले.निवडणूक आयोगाच्या २४ तास देखरेखीखाली असलेले तृणमूल काँग्रेसचे वादग्रस्त नेते आणि बीरभूम जिल्हा अध्यक्ष अनुब्रत मंडल यांनी शर्टावर पक्षाचे चिन्ह लावून मतदान करून आणखी एक वाद निर्माण केला. मात्र आपल्याला याबाबत माहिती नसली तरी निवडणूक अधिकाऱ्याने मला असे करण्यापासून थांबवायला हवे होते, असे मंडल म्हणाले.

मंडल यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे नोंदवली आहे. माल्दा जिल्ह्य़ात इंग्लिशबाझार मतदारसंघातील एका बुथच्या समोरच माकप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या समर्थकांमध्ये झडलेल्या चकमकीत तृणमूलच्या निवडणूक प्रतिनिधीसह दोन जण जखमी झाले.

माकप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात अडथळा निर्माण केल्याची तक्रार तृणमूलचे प्रतिनिधी अनुप सरकार यांनी केल्यानंतर केंद्राबाहेर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते लाठय़ा घेऊन एकमेकांवर भिडले. त्यांना नियंत्रणात आणणे केंद्रीय सुरक्षा दलांना कठीण झाले होते, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी झालेल्या सरकार यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरक्षा दलांची अतिरिक्त कुमक येऊन पोहोचल्यानंतर, ४५ मिनिटांसाठी बंद पडलेले मतदान पुन्हा सुरू झाले.

माल्दा जिल्ह्य़ाच्या चंचोर मतदारसंघातील एका बुथवर येथील माजी सरपंच काँग्रेसचे मकबूल हुसेन यांनी टीएमसीचे प्रतिनिधी अश्रफुल हुसेन यांना मारहाण केल्यानंतर मकबूल यांना पोलिसांनी अटक केली.

बीरभूम जिल्ह्य़ातील डुमरुट खेडय़ात मतदान सुरू होण्यापूर्वी भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक होऊन आठ जण जखमी झाले.

सिलिगुडी मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार व फुटबॉलपटू बायुचंग भुतिया यांनी श्रीगुरू विद्यापीठ केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली

आयोगाशी काय लढता; मोदींचा ममतांना सवाल

* कृष्णनगर: राजकीय पक्षांशी संघर्ष करण्याऐवजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या निवडणूक आयोगाशी लढत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.  त्यामुळे निकालापूर्वीच तृणमूल काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे, अशी टीका पंतप्रधानांनी येथील प्रचारसभेत केली.

* निवडणुका येतात जातात, मात्र संस्था कायम राहतात, हे ममतांनी ध्यानात घ्यावे. ज्याप्रमाणे खेळात पंचांचे आदेश मानले जातात, तशीच स्थिती येथेही आहे.

*  निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा आदर करायला हवा. निवडणूक आयोगाच्या नोटिशीनंतर तुम्ही भूमिका मांडायला हवी. मात्र त्याऐवजी बघून घेण्याची भाषा ममतांना शोभत नाही, असे पंतप्रधानांनी सुनावले.  निवडणूक आयोगाला धमकावण्याच्या आधी लोकांच्या समस्या बघा असे त्यांनी बजावले.