पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. भाजपानं बंगाल काबिज करण्यासाठी शक्ती पणाला लावली असून, त्यांचा अंदाज भाजपाच्या सध्याच्या आक्रमक भूमिकेवरून येताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः पश्चिम बंगाल निवडणुकीत लक्ष घातलं आहे. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत मोठं यश मिळू शकतं, असा अंदाज लावला जात आहे. बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात लावल्या जात असलेल्या अंदाजावरून ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण यांनी मोठी घोषणा केली आहे.

पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आतापासूनच पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं आहे. भाजपानं मिशन बंगाल लक्ष्य नजरेसमोर ठेवतं ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा बराच गाजला. पहिल्या दिवशी भाजपात महाभरती झाली. तर दुसऱ्या दिवशी प्रचंड मोठी रॅली शाह यांनी केली. त्यामुळे भाजपाला निवडणुकीत यश मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा- निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय झाल्यास बंगालच्याच मातीतलाच मुख्यमंत्री देणार : अमित शाह

या चर्चेदरम्यान तृणमूलच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करत घोषणा केली आहे. “माध्यमातील एक वर्ग भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण तयार करत आहे. यातून हे स्पष्ट होतंय की भाजपा दोन अंकी संख्या पार करण्यासाठीही धडपडत आहे. माझं आवाहन आहे की, हे ट्विट जपून करून ठेवा आणि जर भाजपानं चांगलं प्रदर्शन केलं तर मी ट्विटर सोडून देईन,” अशी घोषणा किशोर यांनी केली आहे.

आणखी वाचा- “…मग आडनाव बॅनर्जी, ठाकरे असो किंवा पवार, ते आडवे करणारचं”

प्रशांत किशोर यांच्या या ट्विटनंतर भाजपानं त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. “पश्चिम बंगालमध्ये भाजपाची त्सुनामी आली आहे. सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाला एक रणनीतीकार गमवावा लागेल,” असं म्हणत विजयवर्गीय यांनी टोला लगावला आहे.