मतदानाच्या चौथ्या टप्प्याच्या वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) गोळाबारात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांची बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वाासन ममतांनी मृतांच्या कुटुंबीयांना दिले.

कूचबिहारमध्ये राजकीय नेत्यांना ७२ तासांची प्रवेशबंदी करण्यात आली होती त्यामुळे आपण यापूर्वी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊ शकलो नाही, असे ममता म्हणाल्या. सीआयएसएफने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे सांगण्यात येत असले तरी चौकशी करून दोषी कोण आहे ते आम्ही निश्चितपणे शोधून काढू आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करू, असे ममतांनी म्हटले आहे.

कूचबिहार जिल्ह््यातच आनंद बर्मन या पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकाचीही हत्या करण्यात आली त्यांच्या कुटुंबीयांनाही न्याय दिला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाल्या. ममतांनी मृतांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण त्वरित येऊ आणि तुम्हाला शक्य तितकी सर्वतोपरी मदत करू, असेही या वेळी त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. सीआयएसएफच्या गोळीबारात ज्या पाच जणांनी आपले प्राण गमावले त्यांच्या स्मृत्यर्थ शहीद स्तंभ उभारण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

‘भाजपला ७० जागाही मिळणार नाहीत’

सध्या सुरू असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला ७० जागाही मिळवता येणार नाहीत, असा दावा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला. २९४ सदस्यांच्या विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पहिल्या ४ टप्प्यांमध्ये भाजपने १०० जागा आधीच जिंकल्या आहेत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याची ममता यांनी जलपैगुडी जिल्ह््यातील डाबग्राम- फुलबाडी येथील जाहीर सभेत खिल्ली उडवली.

‘ज्या १३५ जागांसाठी निवडणूक झाली, त्यापैकी १०० जागा भाजपने आधीच जिंकल्या असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. मात्र, निवडणुकांचे सर्व निकाल लागतील तेव्हा एकूण २९४ जागांपैकी भाजपला ७० जागाही मिळणार नाहीत असे मी सांगू शकते’, असे ममता म्हणाल्या.

एकाच मुद्द्यावर निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सांगून भाजप खोटारडेपणा करत असल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी केला.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी होणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी दार्जिलिंगमधील लेबाँग येथे सांगितले होते. मात्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीअंतर्गत अवैध स्थलांतरितांना शोधून काढण्याच्या प्रक्रियेच्या आधारे १४ लाख लोकांची ओळख पटवण्यात आली असून त्यांना स्थानबद्धता शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे, असे ममता म्हणाल्या.

तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला, तर तो वादग्रस्त राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी होऊ देणार नाही, असेही ममता यांनी सांगितले.

‘भाजपने प्रचारासाठी उपऱ्यांना आणल्याने करोनारुग्णांत वाढ’

जलपैगुडी येथे बोलताना ममता म्हणाल्या की, पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने उपऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणले आणि त्यामुळेच राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली.

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवावा, त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, अशी विनंती राज्य सरकारने केली असतानाही त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही ममतांनी येथे एका जाहीर सभेत केला.

भाजपच्या नेत्यांनी प्रचारासाठी उपऱ्यांना आणले आणि त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली, आम्ही करोना नियंत्रणात ठेवला होता, भाजपने स्थिती अधिक गुंतागुंतीची केली, असेही ममता म्हणाल्या.

निवडणूक आयोगाने ममतांवर २४ तासांची प्रचारबंदी केली होती. त्याबद्दल त्या म्हणाल्या की, हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांना एकत्रित मतदान करण्याचे आवाहन करणे ही चूक आहे का, प्रत्येक सभेत आपली खिल्ली उडविणाऱ्या मोदींवर बंदी का नाही, असा सवालही ममतांनी केला.

भाजपचा ‘सोनार बांगला’चा दावा मृगजळ – राहुल गांधी

गोलपोखोर (पश्चिम बंगाल) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथील जाहीर सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढविला. ‘सोनार बांगला’ची निर्मिती करण्याचा भाजपचा दावा म्हणजे मृगजळ आहे, तिरस्कार, हिंसाचार आणि भाषा, धर्म, जात आणि वंश यांच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याशिवाय अन्य काही भाजप देऊ शकत नाही, असे या वेळी राहुल गांधी म्हणाले.

पश्चिम बंगालमधील आपल्या पहिल्याच जाहीर सभेत राहुल गांधी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेस यापूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआचा घटक पक्ष होता, मात्र तृणमूल काँग्रेसप्रमाणे आपला पक्ष भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर कधीही जाणार नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

भाजपला बंगालच्या संस्कृतीचा, वारशाचा विनाश करून फूट पाडावयाची आहे, आसाममध्ये भाजप तेच करीत आहे, तर तमिळनाडूत भाजप आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या अभाअद्रमुकमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. तिरस्कार, हिंसाचार आणि फुटीचे राजकारण याशिवाय भाजप काहीच देऊ शकत नाही, असे गांधी म्हणाले.

बंगालमधील कट-मनी संस्कृतीवरही गांधी यांनी टीका केली. येथील जनतेने तृणमूल काँग्रेसला संधी दिली, मात्र ते असमर्थ ठरले, नोकऱ्यांसाठी बाहेर जावे लागत आहे, नोकऱ्यांसाठी कट-मनी द्यावा लागतो, असे पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे, असेही गांधी म्हणाले.