संपूर्ण जगभरासह भारत देशही करोना विषाणूचा सामना करतो आहे. आजही देशातली सर्वच राज्य करोना विषाणूच्या विळख्यात असून अनेक लोकांना करोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागत आहेत. सध्याच्या काळात आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आहे. करोनामुळे मृत्यू पावलेल्या आपल्या नातेवाईकांचं अंत्यदर्शन घेतानाही नियमांचं पालन करावं लागत आहे. याचाच फायदा काही वाईट प्रवृत्तीची लोकं घेताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमधील एका रुग्णालयाने करोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या मृतदेहाचं अंत्यदर्शन घेण्याआधी मुलाजवळ ५१ हजारांची मागणी केल्याचं समोर येतंय.

“रविवारी दुपारी आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली. सुमारे १ वाजल्याच्या दरम्यान आम्हाला फोन आला. याबद्दल आम्हाला आधीच का सांगितलं नाही विचारलं असता आमचा फोन नंबर नसल्याचं कारण हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी दिलं. ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहचलो त्यावेळी माझ्या बाबांचं पार्थिव थेट स्मशानभूमित घेऊन गेल्याचं आम्हाला समजलं. वडिलांचं शेवटचं दर्शन व्हावं या हेतून आम्ही शिबपूर स्मशानभूमीजवळ पोहचलो त्यावेळी पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायचं असेल तर ५१ हजार रुपये द्या अशी मागणी करण्यात आली.” मयत हरी गुप्ता यांचा मुलगा सागर गुप्ताने इंडिया टुडेशी बोलताना माहिती दिली.

गुप्ता परिवाराने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर समोरच्या व्यक्तींनी तडजोड करण्याची तयारी दाखवत ३१ हजारांची मागणी केली. अखेरीस गुप्ता परिवाराने पोलिसांत तक्रार दाखल करायचं ठरवलं. पोलीस घटनास्थळावर आल्यानंतर हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी करोनाचं कारण देत पोलिसांनाही माझ्या वडिलांच्या पार्थिवापाशी जाऊ दिलं नाही. पार्थिव पहायचं असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला असं ते अधिकारी म्हणत होते, सागर गुप्ताने माहिती दिली. गुप्ता परिवाराने याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची तयारी दाखवली आहे.