पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तृणमूलच्या या कार्यकर्त्यावर गोळीबार होताना पाहून पक्षाच्या पंचायत समितीच्या सभापतींना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही याच झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार तृणमूलचा कार्यकर्त्यांमध्ये एका किरकोळ कारणावरुन वाद झाल्यानंतर हा गोळीबार झाला. मात्र हा वाद नक्की कशावरुन झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली त्याचं नाव संजीत सरकार असं आहे. ज्यावेळी हा सारा प्रकार घडला त्यावेळी तिथे तृणूलचे पंचायत समिती सभापती कालीपद सरकारही उपस्थित होते. कार्यकर्त्यांमधील वादातून झालेला गोळीबार पाहून कालीपद सरकार यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामधील आरोपीसंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

जलपायगुडीमधील हत्येवरुन राजकारण

सोमवारीही राज्यातील जलपायगुडी जिल्ह्यामध्ये तृणमूल कार्यकर्त्याची हत्या झाल्याची बातमी समोर आली होती. रंजीत अधिकारी असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केलीय. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने या हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र भाजपाने हा दावा फेटाळत सत्तेत असणाऱ्या पक्षामधील अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचे म्हटले आहे.

राज्यामधील विधानसभेच्या निवडणुकांआधी ही घटना घडल्याने राजकीय वादातून ती घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजीत अधिकारी रविवारी रात्री क्षाच्या एका कार्यक्रमानंतर घीर येत असतानाच मैनागुडी ब्लॉकमधील सप्तीबारी येथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. रंजीत यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. तृणमूलचे स्थानिक नेते शिवशंकर मजूमदार यांनी या हत्येसाठी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप केलाय. दुसरीकडे जलपायगुडीचे भाजपा उपाध्यक्ष दीपेन प्रमाणिक यांनी ही हत्या तृणमूलमधील अंतर्गत लढाईचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.