मुस्लीम मते तृणमूल काँग्रेसकडेच

पश्चिाम बंगालमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेसचा संयुक्त मोर्चा तृणमूल काँग्रेसविरोधात थोडीफार तरी लढत देईल ही भाजपची आशा पूर्ण फोल ठरली असून डाव्या आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. अब्बास सिद्दीकी यांच्या इंडियन सेक्युलर फ्रंटही मुस्लीम मते खेचून घेण्यात निष्प्रभ ठरल्या. त्यामुळे मुस्लीम मतांचे विभाजन होऊ  शकले नाही, त्याचा फायदा तृणमूल काँग्रेसला झाल्याचे स्पष्ट झाले.

२०१६ मध्ये डावे पक्ष व काँग्रेस वेगवेगळे लढले होते व ही चूक यावेळी सुधारली असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत होते. त्यामुळे संयुक्त मोर्चाला ४०-५० जागा मिळण्याची आशा ही आघाडी बाळगून होती. मात्र, या पक्षांचे वर्चस्व असलेल्या मालदा व मुर्शिदाबाद या जिल्ह्यांमधील विधानसभा मतदारसंघातही विजय मिळवता आला नाही. या दोन्ही जिल्ह्यांमधील अनेक मतदारसंघ मुस्लीमबाहुल्याचे आहेत. माकप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अधिकाधिक लक्ष याच जिल्ह्यांवर केंद्रित केले होते. २०१६ मध्ये माकपला २६ जागा मिळाल्या होत्या. त्याआधी २०११ मध्ये ४० जागांवर माकपचे उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या, २०११ मध्ये ४२ जागा जिंकल्या होत्या. २०२१ मध्ये मात्र दोन्ही पक्षांना तृणमूल काँग्रेसने धोबीपछाड दिला आहे.

पराभव चिंतेचा विषय- काँग्रेस

भाजपच्या विभाजनवादी राजकारणाचा पराभव केल्याबद्दल काँग्रेस पक्ष पश्चिाम बंगालच्या मतदारांचे अभिनंदन करतो, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. पैशाच्या आणि गुंडांच्या ताकदीवर बंगालमधील सामाजिक ऐक्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला आहे. पश्चिाम बंगालमध्ये काँग्रेसचा पराभव हा चिंतेचा विषय आहे पण, निर्णायक विजयाबद्दल तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे काँग्रेस अभिनंदन करत आहे, असेही सुरजेवाला म्हणाले.

भाजपला आत्मपरीक्षणाची गरज: विजयवर्गीय

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे सर्व श्रेय ममता बॅनर्जी यांनाच असल्याची कबुली भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी दिली. पश्चिम बंगालमधील पराभवाबद्दल भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही विजयवर्गीय यांनी सांगितले. राज्यात भाजपची निवडणूक रणनीती ठरवण्याची प्रमुख जबाबदारी विजयवर्गीय यांच्याकडे देण्यात आली होती. गेली दोन वर्षे ते पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते.