पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने लागले आणि राज्यात तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचार घडल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये काही मृत्यू देखील झाल्याची माहिती आली असून त्या पार्श्वभूमीवर आता या हिंसाराचाराच्या घटनांवरून भाजपाकडून ममतादीदींना लक्ष्य केलं जात आहे. आज खुद्द केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोकं त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आपल्याला दौरा मध्येच सोडून परतावं लागल्याचं देखील व्ही. मुरलीधरन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

“तृणमूलच्या गुंडांनी केला हल्ला!”

व्हिडिओमध्ये काही लोक व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर आणि त्यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला करत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये मुरलीधरन यांच्या गाडीच्याही काचा फुटल्याचं व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. हा प्रकार घडल्यामुळे अर्ध्या वाटेतून त्यांच्या ताफ्याला माघारी परतावं लागलं. “पश्चिम मिदनापूरमध्ये तृणमूलच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. गाडीच्या काचा फुटल्या. माझ्यासोबतच्या कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला झाला. त्यामुळे दौरा आटोपता घेण्यात आला”, असं या ट्वीटमध्ये मुरलीधर यांनी म्हटलं आहे.

 

“..तर बंगालमध्ये कोण सुरक्षित?”

दरम्यान, या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी तृणमूलवर टीका केली आहे. “जर एखाद्या मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला होत असेल, तर बंगालमध्ये कोण सुरक्षित आहे? हा राज्य-पुरस्कृत हिंसाचार आहे. बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. या घटनेमधील दोषींवर कारवाई करण्यासाठी विशेष पावलं उचलण्याची गरज आहे”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे बंगालमध्ये येत्या काही दिवसांमध्ये हिंसाराच्या घटनांवर मोठं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

 

समितीमार्फत होणार चौकशी

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्रालयाने पावलं उचलायला सुरुवात केली असून यासाठी ४ सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी बंगालमध्ये दाखल झाले. तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. बंगालमधील हिंसाचार हा देशाच्या फाळणीवेळच्या हिंसाचाराचे स्मरण करून देणारा असून, स्वातंत्र्योत्तर काळात मी असा हिंसाचार कधी पाहिला नाही, असेही नड्डा म्हणाले होते. त्यामुळे या घटना आता वादाचा मुद्दा ठरत आहेत.