झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चक्रधरपूरमध्ये बुधवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. मुंबई हावडा मुख्य रेल्वे मार्गावर राउरकेलाहून टाटानगरकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले.

न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, बिंजय पुलियाजवळ झालेल्या या अपघातात एक वृद्ध महिला, तिचा मुलगा, मुलगी आणि सून यांचा मृत्यू झाला. दीर्घ प्रलंबित मागणीकडे लक्ष न दिल्याने हा अपघात झाल्याचं सांगत स्थानिक लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सर्व मृत बडाबांबोचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. बडाबांबोच्या तिलनादिह येथील रहिवासी सुमी पुर्ती (७१), आपला २१ वर्षीय मुलगा अमर, मुलगी बाह आणि सून यांच्यासह चक्रधरपूर येथील अलाहाबाद बँकेत आल्या होत्या. बडाबांबो येथील आपल्या घरी परतत असताना त्यांनी चक्रधरपूर स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे रुळांची मदत घेतली. दरम्यान, हा रुळ ओलांडत असताना, चौघांना रेल्वेने धडक दिली आणि संपूर्ण कुटुंबाचा जागीच दुःखद मृत्यू झाला.

चक्रधरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीण कुमार आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांना चार मृतांच्या चिंधड्या उडल्याचे आढळले. मृतदेहाचे तुकडे घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर दिसले. मृतदेहाचे काही तुकडेही बिंजय कल्व्हर्टखाली नदीत पडले. यामध्ये रेल्वेचे मोठे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

या भागात दररोज रेल्वेतून जनावरे ठार होण्याच्या घटना घडत आहेत. पण रेल्वेने काहीही पाऊल न उचलल्याने हा मोठा अपघात झाला. चक्रधरपूरमध्ये एकही रेल्वे अंडरपास नाही, ज्याची मागणी सातत्याने वाढत आहे, परंतु चक्रधरपूर नगरपरिषद आणि रेल्वे यांच्यातल्या समन्वयाच्या अभावामुळे ते अजूनही प्रलंबित आहे. दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय मुख्यालय चक्रधरपूरमध्येच आहे.