भाजप खासदार भोला सिंग यांनी बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असताना वादग्रस्त विधान केले. भोला सिंग यांनी सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पावर टीका करताना म्हटले की, पश्चिम भारतात विकास झाला आहे, पण तेथील लोकांकडे मेंदू नाही. ‘स्मार्ट सिटी’सारख्या योजनांमुळे केवळ प्रगत शहरांनाच फायदा होणार आहे. त्यामुळे प्रादेशिक असमतोलात आणखीनच भर पडेल, असे भोला सिंग यांनी म्हटले. भोला सिंग हे बिहारच्या बेगुसराय मतदारसंघाचे खासदार आहेत. आज लोकसभेत पुरवणी प्रश्न विचारताना त्यांनी भाजप नेतृत्त्वावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सरकारच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेवरही सडकून टीका केली. पूर्व भारतात विकासाचा अभाव असला तरी तेथील लोकांना मेंदू आहे. मात्र, पश्चिम भारतात विकास होऊनही तेथील लोकांना मेंदू नाही, असे भोला सिंग यांनी म्हटले. भोला सिंग यांनी हे विधान केले तेव्हा पश्चिम भारताचा भाग असलेल्या गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदीदेखील सभागृहात उपस्थित होते. पश्चिम भारतात गुजरातसह महाराष्ट्र, राजस्थान, गोवा या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे या वक्तव्यावरून वाद पेटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, भोला सिंग यांनी यावेळी नरेंद्र मोदींनी एकदा पूर्व भारतातील लोकांना मेंदू नसून त्याठिकाणी विकासाचा अभाव आहे, असे म्हटल्याचे सांगितले. मात्र, संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी भोला सिंग यांचा दावा फेटाळत मोदींनी कधीही असे विधान केले नसल्याचे सांगितले.