गुजरातवरील ‘वायू’ चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने 15 गाड्या रद्द तर 16 गाड्या अंशिकरित्या रद्द केल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात आल्याची माहितीही पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. वेरावळ, ओखा, पोरबंदर, भावनगर, भुज, गांधीधाम येथील प्रवाशांसाच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत. वेरावळ-अमरेली पॅसेंजर, अमरेली-जुनागड, देलवाडा-वेरावळ हा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील 110 गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे.

दरम्यान, वायू वादळाचा धोका लक्षात घेता रेल्वेने काही गाड्या मध्येच रद्द करण्याचा, तर काही गाड्या पूर्णत: रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वेरावळ, ओखा, पोरबंदर, भावनगर, भुज आणि गांधीधाम येथे जाणाऱ्या गाड्या शुक्रवार सकाळपर्यंत रद्द करण्याचा अथवा मधील स्थानकांवर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गांधीधाम, भावनगर पारा, पोरबंदर, वेरावळ आणि ओखा येथून विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

दरम्यान, ओखा-एर्नाकुलम एक्स्प्रेस, ओखा-हावडा लिंक सुपरफास्ट एक्स्प्रेस, ओखा-रामेश्वरम साप्ताहिक एक्स्प्रेस, ओखा-पुरी द्वारिका एक्स्प्रेस, उत्तरांचल एक्स्प्रेस, ओखा-गुवाहाटी द्वारिका एक्स्प्रेस, सौराष्ट्र मेल, ओखा-वाराणसी सुपर फास्ट एक्स्प्रेस, ओखा-भावनगर पॅसेंजर, ओखा-जयपुर साप्ताहिक एक्स्प्रेस, ओखा-सोमनाथ एक्स्प्रेस, ओखा-गोरखपुर एक्स्प्रेस, ओखा-अहमदाबाद पॅसेंजर, ओखा-राजकोट पॅसेंजर, ओखा-तूतिकोरिन विवेक एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वेने आपात्कालिन नियंत्रण कक्षांना 24 तास अलर्ट राहण्याचे निर्देशही दिले आहेत.