मेघालयाच्या ईस्ट खासी हिल्स जिल्ह्य़ात पहाडाच्या शिखरावर असलेल्या दोन लहान गावांमध्ये ‘पृथ्वीवरील सर्वाधिक ओले ठिकाण’ यासाठी स्पर्धा आहे. जून महिन्यात या दोन्ही ठिकाणी ४ हजार ३०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे.
पूर्वी चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोहरा येथे गेल्या महिन्यात ४३५५.५ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या २० वर्षांत या ठिकाणी एवढा मोठा पाऊस पहिल्यांदाच पडला आहे, असे हवामान खात्याचे अधिकारी विजयकुमार सिंग यांनी सांगितले. यापूर्वी १९९५ साली येथे ४७१०.९ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती, असे ते म्हणाले. फक्त एका दिवशी पावसाच्या सरींचा अपवादवगळता, संपूर्ण जून महिन्यात एकही दिवस पावसाशिवाय नव्हता, अशी माहिती त्यांनी दिली. हाच प्रकार सोहरापासून पश्चिमेला १० किलोमीटर असलेल्या मौसिन्राम या गावाबाबतही घडत आहे. गुवाहाटी येथील विभागीय वेधशाळेने ठेवलेल्या रेकॉर्डनुसार, जून महिन्यातील पावसाबाबत मौसिन्रामने सोहरा गावावरही मात केली. या ठिकाणी जून महिन्यात एकूण ४७८१.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे ‘सर्वाधिक ओले ठिकाण’ असा बहुमान मौसिन्रामलाच मिळायला हवा होता, परंतु या ठिकाणचा डाटा ‘वादग्रस्त’ आहे. मौसिन्राम येथे हवामान खात्याचे पूर्णवेळ कार्यालय नसून, मेघालय सरकारचा एक ‘अननुभवी आणि अप्रशिक्षित’ कर्मचारी हवामान खात्यासाठी नोंदी करतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही दोन्ही गावे टेकडय़ांनी विभागली गेली असून, त्या दोघांपेक्षा जास्त पाऊस झालेली इतर खेडी त्यांच्या दरम्यान असू शकतील, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.