प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची हानी होते हे आपल्याला ठाऊक आहेच. महाराष्ट्र सरकारनेही नुकताच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. मात्र या प्लास्टिक पिशव्या आता प्राणी आणि मासे यांना बसू लागला आहे. एक देव मासा मृतावस्थेत आढळला आहे. त्याच्या पोटात एक दोन नाही तब्बल २९ किलोच्या प्लास्टिक पिशव्या सापडल्या आहेत. ही घटना स्पेन या देशातील आहे. स्पेनमध्ये एक महाकाय देवमासा मृतावस्थेत आढळून आला. या देव माशाच्या पोटात २९ किलोचे प्लास्टिक आढळले आहे. द ‘डेली मेल’ने या संदर्भातली बातमी दिली आहे.

स्पेनच्या दक्षिण भागात समुद्राच्या पाण्यावर तरंगणारा एक भला मोठा देवमासा मृतावस्थेत आढळून आला. त्याची ऑटप्सी करण्यात आली. तेव्हा त्याच्या पोटात २९ किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. समुद्रात जे प्लास्टिक कचरा म्हणून फेकले जाते ते पोटात गेल्याने, गिळले गेल्याने या भल्या मोठ्या देव माशाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

या महाकाय देवमाशाची लांबी १० मीटर म्हणजे सुमारे ३३ फूट इतकी आहे. तर त्याचे वजन सहा टनापेक्षा जास्त आहे. ज्या प्रमाणे पोटात प्लास्टिकचा कचरा अडकून या माशाचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे इतरही काही समुद्री जिवांना या प्लास्टिकचा फटका बसला आहे असे स्पेनच्या पर्यावरण विभागाचे संचालक कौन्सिलो रोसायुरो यांनी म्हटले आहे. खरेतर अशा प्रकारचे देव मासे हे जगातल्या महासागरांमध्ये आढळतात. त्यांचा अशा प्रकारे प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे मृत्यू होणे ही बाब दुर्दैवी असल्याचे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.