दिलसुखनगर भागाची दहशतवाद्यांनी टेहळणी (रेकी) केल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडे होती. ती त्यांनी हैदराबाद पोलिसांना कळवली होती का, जर ती कळविली असेल, तर हैदराबाद पोलिसांनी त्यावर काय कारवाई केली, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी अपेक्षा लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
हैदराबादमध्ये गुरुवारी संध्याकाळी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले होते, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी रात्री सांगितले. पुण्यामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याने हैदराबादमधील दिलसुखनगर भागाची रेकी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली होती. याचा संदर्भ घेत सुषमा स्वराज यांनी केंद्रीय गृह मंत्रालयापुढे वरील प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, दहशतवाद्यांचा कोणताही रंग, धर्म नसतो. या संकटाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्रित होऊन विचार केला पाहिजे.