प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’ या आपल्या दोन्ही कंपन्यांचे फेसबुक पेज बंद करुन सोशल मीडियाच्या विश्वात एकच खळबळ उडवून दिली आहे. एका टि्वटर युझरने दिलेल्या आव्हानामुळे मस्क यांनी तडकाफडकी फेसबुक पेज बंद करतोय असे दाखवले असले तरी मस्क आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यातील अंतर्गत स्पर्धा हे सुद्धा यामागे एक कारण असू शकते. मस्क आणि झुकरबर्ग दोघेही तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज असून काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवरुन (कृत्रिम बुद्धिमत्ता) मोठा वाद झाला होता.

रोबोटसची निर्मिती ज्या मानवाने केली त्यांनाच ते एकदिवस संपवतील का ? त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक लढाई जुंपली होती. भविष्यात जास्त धोका कृत्रिम बुद्धिमत्तेपासून असून यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले जातील असे मस्क म्हणाले होते. त्यांच्या या मताबद्दल जेव्हा झुकरबर्ग यांना फेसबुक लाईव्ह दरम्यान एका युझरने प्रश्न विचारला त्यावर मस्क यांचे हे मत पटणारे नसून बेजबाबदारपणाचं लक्षण आहे असे झुकरबर्गने म्हटले होते.

त्यावर मस्क यांनी झुकरबर्गची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयाची समज मर्यादीत आहे असे टि्वट केले होते. फेसबुक पेजप्रमाणे फेसबुकचे फोटो शेअरींग अॅप इन्स्टाग्रामवरुन कंपनींचे प्रोफाईल डिलिट करण्याची मागणी अनेक युझर्सनी केली होती. त्यावर इन्स्टाग्रामबद्दल कोणतीही समस्या नसून ते बऱ्यापैकी स्वतंत्र आहे असे मस्क यांनी म्हटले आहे.