काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ११ हजार ४०० कोटी रुपयांना चुना लावून नीरव मोदी देश सोडून फरार झाला आहे. तसेच त्याच्याआधी विजय मल्ल्याही ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळाला आहे. या सगळ्यात स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत? असा प्रश्न राहुल गांधी ट्विटरद्वारे विचारला आहे. तसेच ModiRobsIndia हा हॅशटॅगही त्यांनी ट्रेंड केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि ललित मोदी प्रकरणांवर काहीही भाष्य करत नाहीत यावरूनच ते कोणाशी प्रामाणिक आहेत हे स्पष्ट होते आहे असेही राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. न खाऊंगा ना खाने दुंगा हे तुमचे धोरण होते त्याचे नेमके काय झाले हे देशाला सांगाल का? असेही राहुल गांधी यांनी विचारले आहे.

नीरव मोदी पीएनबी बँकेचे ११ हजार ४०० कोटी बुडवून फरार झाला. त्यानंतर काँग्रेससह सगळ्याच विरोधकांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तसेच सगळ्याच विरोधकांनी या घोटाळ्यासाठी पंतप्रधानांना जाब विचारला आहे. यात राहुल गांधी यांनीही आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरद्वारे टीका करत खोचक ट्विट केला आहे. बँकिंग घोटाळ्यावर मोदींनी २ मिनिटे तरी बोलावे असे म्हणत राहुल गांधी यांनी याआधीच पंतप्रधानांकडे उत्तर मागितले होते. मुलांना परीक्षेसाठी मार्गदर्शन केलेत ही चांगली गोष्ट आहे पण बँकिंग घोटाळ्यावर सातत्याने मौनच का बाळगता? असेही राहुल गांधी यांनी विचारले होते त्यानंतर आता तुम्ही कोणाशी प्रामाणिक आहात हेच तुमचे मौन सांगते आहे असे म्हणत त्यांनी टीका केली.

देशातील सर्वांत मोठ्या बँकेच्या घोटाळ्याप्रश्नी संपूर्ण माहिती देण्याची काँग्रेस मागणी करत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहेच. तसेच या घोटाळ्याची सुरुवात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यावेळी झाली जेव्हा पंतप्रधानांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या आणि देशाचा सर्व पैसा बँकिंग प्रणालीमध्ये टाकला होता. यामुळेच नीरव मोदीला बँकांमधून पैसे उपलब्ध झाले, असा आरोपही राहुल गांधी यांनी या आधी केला होता.