काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना बुधवारी सीबीआयने चेन्नई विमानतळावरुन अटक केली. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून यामुळे पी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे याचा घेतलेला हा आढावा….

> आयएनक्स मीडिया ही पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीची कंपनी आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत.

> आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) स्वीकारला होता. त्यापाठोपाठ अर्थमंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती.

> आयएनएक्स मीडियाने नियमांचे उल्लंघन करत आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ टक्के गुंतवणूक करताना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. यामुळे फक्त ४. ६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकी गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली.

> प्राप्तिकर खाते आणि महसूल विभागाने या प्रकरणात कंपनीला नोटीसही बजावली. मात्र, त्यावेळी कार्ती चिदंबरम कंपनीच्या मदतीला धावून आले, असे सांगितले जाते. त्यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या पदाचा वापर करत कंपनीला नव्याने परवानगी मिळवून दिली. त्यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते.

> या मोबदल्यात कार्ती यांच्याशी संबंधीत कंपन्यांमध्ये साडे तीन कोटींहून अधिक रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे.

> सीबीआयने या प्रकरणात मे २०१७ मध्ये कार्ती चिदंबरम, त्यांची चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी, तसेच अॅडव्हॉन्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीच्या पद्मा विश्वनाथन, आयएनएक्स मीडियाचे संचालक पीटर व इंद्राणी मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

> पी. चिंदबरम, त्यांची पत्नी नलिनी व मुलगा कार्ती चिंदबरव हे तिघेही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. नलिनी यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या शारदा चिटफंड घोटाळ्यात कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप आहे. तर कार्ती यांच्यावर राजस्थान रुग्णवाहिका गैरव्यवहाराप्रकरणी आरोप झाले होते. एअरसेल- मॅक्सिस प्रकरणातही चिदंबरम पिता-पुत्रांवर आरोप झाले होते.

> अंमलबाजवणी संचालनालयाकडूनही कार्ती चिदंबरम यांची चौकशी होण्याची शक्यता असून जानेवारीमध्ये ईडीनेही  कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील घरांवर छापे टाकले होते.