आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या आरोपानंतर सचिन पायलट यांनी थेट दिल्ली गाठली होती. पायलट यांच्यासोबत १८ आमदार असून, ते सध्या दिल्लीत आहेत. या आमदारांना भाजपानं ओलिस ठेवलं असल्याचा आरोप गेहलोत यांनी एका पत्रकार परिषदेत केला. त्यावर आता पायलट समर्थक आमदारांनी आपलं म्हणणं एक व्हिडीओतून मांडलं आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या एकतेसाठी गेहलोत यांच्याकडे एक मागणीही केली आहे.

आणखी वाचा- “…तर मी पायलट यांचे स्वागत करेन”; अशोक गहलोत यांची ‘ऑफर’

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट समर्थक आमदारांना भाजपानं ओलिस ठेवल्याचा आरोप केला होता. आमदारांच्या निवासस्थानी बाऊंन्सर लावले असल्याचंही गेहलोत म्हणाले होते. गेहलोत यांनी केलेले आरोपा पायलट समर्थक आमदारांनी फेटाळून लावले आहेत. या आमदारांनी एका व्हिडीओतून आपलं म्हणणं मांडलं आहे. आमदार मुरारी लाल मीना म्हणाले, “आम्ही सध्या दिल्ली राहत आहोत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हणाले की, आम्हाला भाजपानं ओलिस ठेवलं आहे. हे पूर्णपणे खोटं आहे. आम्ही कधीही भाजपाच्या संपर्कात नव्हतो. उलट मुख्यमंत्र्यांकडून एसओजीचा वापर केला जात असल्यानं आमच्या कुटुंबामध्ये भीती निर्माण झाली आहे. आम्ही काँग्रेससोबत असताना ते असं करत आहेत. त्यांच्याकडून आमची निराशा झाली आहे. ते तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. आता त्यांनी काँग्रेसच्या एकतेसाठी मुख्यमंत्री पद सोडून द्यावं,” असं पायलट समर्थक आमदारांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राज्यपाल विरुद्ध गेहलोत; काँग्रेस आमदारांची राजभवनात निर्दर्शनं

आणखी वाचा- “…तर सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होऊ शकतात”; भाजपा प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान

काय म्हणाले होते मुख्यमंत्री गेहलोत?

राज्यपालांना भेटायला जाण्याआधी गेहलोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना गेहलोत म्हणाले होते की, “आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे असं वारंवार सांगत आहोत. चिंता आम्हाला असली पाहिजे, पण तेच चिंतेत आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना ओलिस ठेवण्यात आलं आहे. त्यांनाही कदाचित तेथून सुटका करुन घ्यायची असेल. तिथे पोलीस, बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. फोन काढून घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारला याची काळजी नाही का ? हे सगळं भाजपाचं षडयंत्र आहे,”असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला होता.