अर्थसंकल्पातील तरतुदींना अमेरिकी कॉंग्रेसने मान्यता न दिल्यामुळे तेथील नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच आजपासून अत्यावश्यक सेवावगळता अन्य सर्व सरकार अंगिकृत सेवा थांबविण्यात येतात. जोपर्यंत कॉंग्रेस सरकारी खर्चाला मंजुरी देत नाही, तोपर्यंत या सर्व सेवा बंद ठेवण्यात येतात. याच स्थितीला सरकारी आर्थिक कामकाज ठप्प (यूएस गव्हर्मेंट शटडाऊन) होणे , असे म्हणता येईल.
सरकारी सेवा का थांबविण्यात आल्या?
अमेरिकेमध्ये आर्थिक वर्षाचा शेवट ३० सप्टेंबरला होत असतो. त्याआधी अमेरिकी कॉंग्रेसची प्रतिनिधीगृह आणि सिनेट ही दोन सभागृह सरकारी खर्चाला मंजुरी देत असतात. मात्र, यावेळी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आरोग्य देखभाल विधेयकावरील खर्च कमी करण्याची रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांची मागणी आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली नाही.
परिणाम किती?
अमेरिकी सरकारचे एक तृतियांश कामकाज यामुळे ठप्प होणार आहे. सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱयांना विनावेतन घरी बसावे लागणार आहे. नासासह अन्य महत्त्वाच्या संस्थांचे कामकाजही बंद ठेवण्यात येईल. केवळ लष्कराचे आणि देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित कामकाज सुरू राहील. हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष, अणुऊर्जा आणि अण्वस्त्रे यांच्याशी संबंधित कामकाज सुरू राहिल.
कॉंग्रेसने अर्थसंकल्पास मंजुरी देण्यास नकार दिला तर काय?
अमेरिकी सरकारवर मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. सरकारी खर्चात तातडीने ३२ टक्क्याने कपात करावी लागेल.