देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना करोनाची लस दिली जात आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडूनच लसीकरण करून घेणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशभरातील अनेक दिग्गज मंत्री ते सर्वसामान्य नागरिक लसीकरणासाठी रुग्णालय गाठत आहेत. मात्र, असे असताना कर्नाटकमधील एका मंत्रीमोहदयांनी घरीच सपत्नीक लसीकरण करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर जोरदार टीका होऊ लागल्याने व केंद्रीय आरोग्य विभागाने याची दखल घेतली व कर्नाटक सरकारकडून यासंदर्भातला अहवाल मागवल्यावर, या मंत्रीमोहदयांनी याबाबतचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, …यात काय चूक आहे?असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

“जर मी लसीकरणासाठी रुग्णालयात गेलो, तर तेथील लोकांना मी तिथे भेट दिल्यामुले थांबावे लागेल. परंतु, मी इथं मी लोकांना भेटू शकतो आणि लस देखील घेऊ शकतो, यात काय चूक आहे?” असं घरी लसीकरण करून घेणारे कर्नाटकचे मंत्री बीसी पाटील यांनी स्पष्टिकरण दिलं आहे.

लसीकरणाचा प्रोटोकॉल पाळण्याचा नागरिकांना दिला आहे सल्ला –
कर्नाटकचे कृषीमंत्री बीसी पाटील यांनी आज (मंगळवार) सकाळी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून काही फोटो ट्विट केले. ज्यामध्ये त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे घरी करोनाची लस घेतानाचे फोटो होते. यासोबत त्यांनी नागरिकांना लसीकरणाला न घाबरण्याच्या सल्ला देखील दिला होता.

“आज माझ्या हिरेकरूर येथील घरी मी पत्नीसोबत सरकारी डॉक्टरांकडून करोनाची लस घेतली आहे. अनेक देशांकडून भारतात बनवण्यात आलेल्या लशीचं कौतुक होत असताना, काहीजण लशीबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. माझं लसीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी लसीकरणाचा प्रोटोकॉल पाळून लस घ्या आणि करोनामुक्त भारतासाठी हातभार लावा”, असा संदेश देखील त्यांनी दिला होता. विशेष म्हणजे यात त्यांनी स्वत:च इतरांना प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला होता!

सामान्य जनता रांगेत आणि मंत्र्यांना मात्र घरपोच करोनाची लस? आरोग्य विभागाने घेतली दखल!

एकीकडे विविध रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी काल लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोविन अॅप बंद पडल्याने, तासंतास या ज्येष्ठांना रांगेतच ताटकळत थांबावं लागल्याचंही दिसून आलं. तर, दुसरीकडे मंत्रीमोहदयांचे घरीच सपत्नीक लसीकरण केले गेल्याने, नागिरकांमध्ये तीव्र नाराजी व संतपाचे वातावरण पाहायला मिळत आहे.