देशात अनेक ठिकाणी निर्बंधांमध्ये सूट दिल्यानतंर अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीतही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ यांनी रविवारी अजब वक्तव्य केलं आहे. त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केले आहे.

“करोना मध्य प्रदेशचे काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तरुण चुघ यांचे म्हणणे आहे की करोना व्हायरस मध्य प्रदेशचे काही नुकसान करु शकत नाही, कारण जिथे मुख्यमंत्री शिव आहेत आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णु आहेत.

या वर्षी डिसेंबर पर्यंत देशाच्या आरोग्य केंद्रांमध्ये करोनाच्या लसीचे १३५ कोटी डोस पोहोचवले जातील असे चुग यांनी म्हटले आहे. यावर टीका करताना काँग्रेस प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी भाजपाचे नेते हे फक्त पक्षाच्या कार्यकर्त्याकडून कौतुक ऐकण्यासाठी अशी वक्तव्य करतात असं म्हटलं आहे.

गुप्ता यांनी दावा केला आहे की, यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान मध्य प्रदेशमध्ये ३.२८ लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जो सामान्य मृत्यू दरापेक्षा ५४ टक्के अधिक होता. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वतः कबुल केलं होतं की भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या कुटुंबातील ३,५०० लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.

चुघ यांच्या या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. एका ट्विट युजरने म्हटले आहे की, आता शिव, राम, शंकर, विष्णु नावे असलेल्यांना आता लस घ्यायची गरज नसणार आहे. तर एकाने शिवराज सिंह यांना तात्काळ पंतप्रधान बनवायला हवं असं म्हटलं आहे.

शनिवारी एका कार्यक्रमात चुघ यांनी दावा केला होता की, जर कोणत्याही प्रकारची लाट आली तर भाजपा आणखी चांगल्या पद्धतीने तिचा सामना करु शकते. त्यांचे कार्यकर्ते देशाच्या प्रत्येक गावामध्ये काम करण्यासाठी तयार आहेत असे त्यांनी म्हटले आहे.