News Flash

करोना प्रतिबंध लसीकरण कार्यक्रम कसा असेल? पंतप्रधानांनी सविस्तर केलं स्पष्ट

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

करोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम कसा असेल याची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलं.

मुख्यमंत्र्यांशी बोलताना मोदी म्हणाले, “कोविडच्या बिकट परिस्थितीत आपण एकमेकांसोबत काम करत आहोत, याबाबत मी समाधानी आहे. सर्व राज्यांनी संवेदनशील पद्धतीने तातडीने निर्णय घेतले. त्याचाच परिणाम म्हणून जगात जितक्या मोठ्या प्रमाणावर करोनाचा फैलाव झाला तितक्या प्रमाणात तो भारतात झाला नाही.”

१६ जानेवारीपासून सुरु होणार जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम

मोदी म्हणाले, १६ जानेवारीपासून भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दोन ‘मेड इन इंडिया’ लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

सर्वात आधी कोणाला मिळणार लस?

सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, कोविडशी आघाडीवर लढणारे इतर कर्मचारी, संरक्षण दलं, पोलीस आणि इतर निमलष्करी दलं यांचं पहिल्या टप्प्प्यामध्ये लसीकरण केलं जाणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ३ कोटी कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील रुग्णांना लस दिली जाईल. दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये ३० कोटी लोकांना लस देण्याचं आमचं ध्येय आहे.

कोविड योद्ध्यांना मोफत मिळणार लस

जर सर्व राज्यातील आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांची संख्या पाहिली तर ती सुमारे ३ कोटी इतकी आहे. हे निश्चित झालं आहे की, या पहिल्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणासाठी राज्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. भारत सरकार हा खर्च करणार आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

लसीकरणादरम्यान ओळख पटवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

या लसीकरण मोहिमेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्यांनी लस घेतली आहे, त्यांची ओळख पटवणं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना ‘कोविन अ‍ॅप’ हा एक डिजिटल प्लॅटफॉर्मही बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर आधारच्या मदतीने लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल. त्याचबरोबर त्यांना दुसरा डोस वेळेवर मिळावा हे देखील निश्चित केलं जाईल. माझं सर्वांना आवाहन आहे की यासंदर्भातील रिअल टाईम डेटा को-विन वर अपलोड व्हायला हवा. यातील जराशीही चूक या मोहिमेला अपयशी करु शकते, असं मोदी यावेळी म्हणाले.

कोविन अ‍ॅप कसं करेल काम?

कोविन अ‍ॅप पहिल्या डोसनंतर लसीकरणाचं एक डिजिटल प्रमाणपत्र तयार करेन. लस दिलेल्या व्यक्तिला हे प्रमाणपत्र तात्काळ देणं गरजेचं आहे त्यासाठी त्याला पुन्हा यावं लागू नये. यामुळे कोणी डोस घेतला आहे हे कळू शकेनच त्याचबरोबर दुसरा डोस त्याला कधी घ्यावा लागेल हे देखील कळेल. दुसऱ्या डोसनंतर अंतिम प्रमाणपत्र दिलं जाईल. लसीकरणासाठी भारत ज्या गोष्टी करेन त्याचा वापर जगातील इतर देशही करतील. त्यामुळे आपली जबाबदारी खूपच अधिक आहे, असं मोदींनी यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीदरम्यान सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 5:12 pm

Web Title: what will the corona prevention vaccination program look like the prime minister made it clear aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुलाच्या ऑनलाईन क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वडिलांनी टाकला पॉर्न व्हिडीओ
2 आपचा आमदार म्हणाला, “योगी की मौत सुनिश्चित हैं”; भाजपाकडून केजरीवाल यांना आव्हान, म्हणाले…
3 जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
Just Now!
X