X
X

कर्नाटकातल्या राजकीय नाटयामागचे नरेंद्र मोदी खरे सूत्रधार – सिद्धरामय्या

कर्नाटकात सध्या जो काही सत्तेचा खेळ रंगला आहे त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

कर्नाटकात सध्या जो काही सत्तेचा खेळ रंगला आहे त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या राजभवनात झालेल्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा का अनुपस्थित होते ? या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात सुरु असलेल्या खेळामागे पंतप्रधान मोदीच असल्याचे सांगितले. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

कर्नाटकात भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यामध्ये अजिबात असुरक्षिततेची भावना नसून काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक संख्याबळ आहे असे ते म्हणाले. बहुमत नसताना राज्यपालांनी येडियुरप्पांना सत्ता स्थापनेचे जे निमंत्रण दिले त्याचा मी निषेध करतो असे सिद्धरामय्या म्हणाले.

दरम्यान आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यांना आता येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करायचे आहे.

सकाळी नऊ वाजता राजभवनाच्या लॉनवरील ग्लास हाऊसमध्ये कडेकोट बंदोबस्तात त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. या वेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जे.पी. नड्डा आणि भाजपाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, शपथविधीला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी सकाळी विविध मंदिरांमध्ये जाऊन देव दर्शन घेतले.

22
First Published on: May 17, 2018 5:39 pm
  • Tags: siddaramaiah,
  • Just Now!
    X