पीडीपी आणि भाजपाचे सरकार जेव्हा सत्तेवर आले तेव्हापासूनच दहशतवाद बळावला. तीन वर्षांनी भाजपाने आपली चूक मान्य करत सत्तेतून काढता पाय घेतला आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये मागील तीन वर्षात दहशतावादी हल्ले वाढले, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले.

भाजपाने जम्मू काश्मीरला बरबाद करण्याचे काम केले. पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला आणि आता सत्तेतून बाहेर पडले आहे. रमजानच्या महिन्यात ४१ हत्या झाल्या आणि २० बॉम्ब हल्ले झाले या सगळ्या घटनांच्या जबाबदारीपासून भाजपा पळ काढू शकत नाही. पीडीपी आणि भाजपा हे दोन्ही पक्ष जम्मू काश्मीरच्या अशांततेसाठी जबाबदार आहेत असाही आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला. पत्रकार मारले गेले, सामान्य माणसे मारली गेली, सैनिक मारले गेले या सगळ्याची जबाबदारी याच दोन्ही पक्षांची आहे. या दोन्ही पक्षांचे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही हे वाटतच होते. तसेच घडले आहे.

जम्मू काश्मीरला विकासाचे स्वप्न दाखवून भाजपाने आणि पीडीपीने तिथल्या नागरिकांची फसवणूक केली. काँग्रेस किंवा नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये होते तेव्हा विकास होत होता, अनेक कामेही सुरु झाली होती. मात्र पीडीपी भाजपाचे सरकार जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आले तेव्हाच इथे विनाशाची सुरुवात झाली असाही आरोप आझाद यांनी केला. हे सरकार आता गेले त्यामुळे जम्मू काश्मीरच्या लोकांनी थोडासा का होईना सुटकेचा निश्वास सोडला असेल असाही टोला त्यांनी लगावला.