व्हॉट्स‍अॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विटरच्या माध्यमातून फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन केलं आहे. ब्रायन अॅक्टन यांनी ट्विट करत ही योग्य वेळ असून फेसबुक डिलीट करा असं सांगितलं आहे. हे ट्विट अशावेळी करण्यात आलं आहे जेव्हा काही दिवसांपुर्वी राजकीय डाटा विश्लेषक कंपनी कॅम्ब्रिज ऍनालिटिकाने कोणतीही परवानगी न घेता फेसबुकवरील पाच कोटी युजर्सचा डेटा चोरल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणानंतर फेसबुकवरील गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.

फेसबुकने २०१४ मध्ये व्हॉट्सअॅपला खरेदी केलं होतं. व्हॉट्सअॅपची विक्री झाल्यानंतरही कॅम्ब्रिज ऍनालिटिका फेसबुकशी जोडलेले होते. मात्र वर्षाच्या सुरुवातीला आपली स्वत:ची सिग्नल फाऊंडेशन कंपनी सुरु करण्यासाठी त्यांनी फेसबुकला रामराम केला.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २०१६ साली झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना या निवडणुकीत मदत करणा-या ‘कॅम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीने जवळपास ५ कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. निवडणुकीत या चोरलेल्या माहितीचा वापर केला गेला, असाही आरोप आहे. सोमवारी फेसबुकचे शेअर सात टक्क्यांनी घसरले होते. कॅम्ब्रिज ऍनालिटिकाने युजर्सचा डेटा लीक केल्याचं समोर आल्यानंतर फेसबुकच्या शेअर्सवर परिणाम झालेला पहायला मिळाला. शेअर्स घसरल्याने फेसबुकला जवळपास ६.०६ अब्ज डॉलरचे (३९५ अब्ज रुपये) नुकसान झाले.

फेसबुकने डेटा लीक प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन फॉरेन्सिक कंपन्यांना नियुक्त केलं आहे. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक कंपनी स्ट्रॉज फ्राइडबर्ग कॅम्ब्रिज अॅनालिटिकाचं ऑडिट करणार आहे. कंपनीने आपल्या सर्व्हेर आणि सिस्टीमचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.