उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅपवर योगी आदित्यनाथ यांचं घर बॉम्बस्फोट करुन उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून योगी आदित्यनाथ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांना आलेल्या या मेसेजमध्ये योगी यांच्या घराबरोबरच इतर पाच ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबरोबर ५० ठिकाणांची सुरक्षा वाढवली आहे.

लखनौमधील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असून येते सुरक्षा वाढवण्यात आली आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिली आहे. हा धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथकांच्या मदतीने या संपूर्ण परिसराची पहाणी करण्यात आली. या परिसरामध्ये योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा आणि इतर काही महत्वाच्या व्यक्तींची घरेही आहेत. या प्रकरणातील दोषी व्यक्तीचा पकडण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे.

या प्रकरणात गौतमपल्ली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हलचाली सुरु झाल्या आहेत. या प्रकरणा अपर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनी या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मे महिन्यातही घडलं होतं असंच प्रकरण…

मागील महिन्यामध्येही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना अशी धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची धमकी देण्याप्रकरणी मुंबईमधील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. सोशल मिडिया डेस्कच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव कमरान आमीन आहे. कमरानने पोलिसांच्या सोशल मिडिया डेस्कवर फोन करुन धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला आणि या व्यक्तीचा ठाव ठिकाणा शोधून काढला. त्यानंतर मुंबईमधील दहशतवादी विरोधी पथकामने कमरानला अटक केली. त्यानंतर कमरानला उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात देण्यात आला. चौकशीदरम्यान कमरानने ही धमकी देण्याठी आपल्याला एक कोटी रुपये देण्यात येणार असल्याची ऑफर मिळाल्याचा खुलासा केला. मात्र ही ऑफर कुणी दिली होती हे त्याने सांगितलं नाही.  योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून त्यांना अनेकदा अशाप्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत.