इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपकडून भारतात डिजिटल पेमेंट सेवा सुरु करण्यात येणार आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये व्हॉट्स अॅपचा वापर केला जातो. मात्र व्हॉट्स अॅप डिजिटल पेमेंट सेवा सर्वप्रथम भारतात सुरु करणार आहे. या नव्या सेवेसाठी व्हॉट्स अॅपने तयारी सुरु केली आहे.

भारतात व्हॉट्स अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या तब्बल २० कोटी इतकी आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपसाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जगभरातील व्हॉट्स अॅप वापरकर्त्यांची संख्या अब्जाहूनही अधिक आहे. त्यामुळे वीचॅट कंपनीने चीनमध्ये ज्या प्रकारे डिजिटल पेमेंटची सुरुवात केली, त्याचप्रकारे व्हॉट्स अॅपकडून भारतात डिजिटल पेमेंट सेवा सुरु केली जाणार आहे.

पुढील सहा महिन्यांमध्ये व्हॉट्स अॅपकडून पर्सन टू पर्सन (पी टू पी) पेमेंट सेवा सुरु केली जाणार आहे. द केन या संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे. व्हॉट्स अॅपने त्यांच्या संकेतस्थळावर याबद्दल जाहिरात दिली आहे. तांत्रिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेले कर्मचारी हवे असल्याचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला आहे. भारतातील युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) आणि भीम पेमेंट अॅपचे ज्ञान असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल, अशी जाहिरात व्हॉट्स अॅपकडून देण्यात आली आहे.

‘भारत हा व्हॉट्स अॅपसाठी महत्त्वाचा देश आहे. आमच्या माध्यमातून डिजिटल इंडियामध्ये कसे योगदान दिले जाऊ शकते,’ असे व्हॉट्स अॅपच्या वापरकर्त्यांनी म्हटले आहे. ‘डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात कशा पद्धतीने काम केले जाऊ शकते, यावर आमचा विचार सुरु आहे. यासाठी काही कंपन्यांसोबत बातचीत सुरु आहे,’ असे व्हॉट्स अॅपच्या प्रवक्तांनी सांगितले. मात्र व्हॉट्स अॅपची संपूर्ण योजनेबद्दल बोलणे त्यांनी टाळले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा निर्माण झाला. चलनातील तब्बल ८६% रक्कम कागज का तुकडा झाल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला. त्यामुळे रोख व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते.