पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टिप्पणी ही संसद व देशाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी केली. जेव्हा एखादा पंतप्रधान त्यांचे पूर्वसूरी आणि त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीची खिल्ली उडविण्यापर्यंतच्या पातळीला जातो, तेव्हा संसद आणि देशाची प्रतिष्ठा मलिन होते. मोदी स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. संसदेत जो काही प्रकार घडला तो निराशाजनक आणि खरे बोलायचे झाल्यास लज्जास्पद होता, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढवला. यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही पुन्हा एकदा तोंडसुख घेतले. नोटाबंदीमुळे सामान्यांच्या खिशातले पैसे धनाढ्यांच्या खिशात गेल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला होता. मनमोहन सिंग यांनी अडीच महिन्यांपूर्वी राज्यसभेत मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वाभाडे काढले होते. त्याचा संदर्भ देत मोदींनी काल मनमोहन सिंग यांना लक्ष्य केले होते. देशाच्या आर्थिक निर्णयांशी थेट, निर्णायक संबंध ठेवूनही ३०-३५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत एवढे घोटाळे घडूनही मनमोहन सिंग यांच्यावर एक कलंक लागला नाही, याकडे लक्ष वेधत स्नानगृहात रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला तर डॉक्टरसाहेबांनाच ठाऊक आहे, अशी जळजळीत टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. मोदींच्या या टीकेनंतर सभागृहातील काँग्रेस सदस्य संतप्त झाले होते. माजी पंतप्रधानांविषयी अशा स्वरुपाचे विधान करणे योग्य नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे होते. शेवटी काँग्रेस खासदारांनी सभात्याग करत आपला निषेध नोंदवला होता. माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनीदेखील मोदींनी अभिभाषणावरील चर्चेला दिलेले उत्तर म्हणजे केवळ निवडणुकीचे भाषण असल्याची टीका केली. त्यांचे बोलणे उद्दाम आणि वास्तवाशी नाळ तुटलेले होते, असेही सीताराम येचुरी यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधकांनी सभात्याग केल्यावर मोदी या विधानावर दिलगिरी व्यक्त करतील का. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मोदींनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. पदाच्या प्रतिमेला धक्का बसत असताना तुम्ही काही बोलत नव्हता. आता तुम्ही ऐकून घेण्याचे धाडसही दाखवले पाहिजे, असे मोदींनी सांगितले.