१९६५च्या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानातील ताणलेले संबंध आणि भारताचा वाढता दबदबा, या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री ताश्कंदला गेले होते. रशियाच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानात ताश्कंद करार होणार होता. या करारासाठी गेलेल्या शास्त्रीजींना सोव्हिएत युनियनचे प्रमुख अ‍ॅलेक्सी कोसिजीन यांनी एक कोट भेट म्हणून दिला होता. मात्र भारताच्या या दिलदार पंतप्रधानाने आपल्याला मिळालेली भेटवस्तू आपल्यासह ताश्कंद येथे आलेल्या सरकारी अधिकाऱ्यास उदारपणे दिली. शास्त्रीजींच्या या औदार्यामुळे कोसिजीन यांनी त्यांचा ‘महाकम्युनिस्ट’ अशा शब्दांत गौरव केला.
भारताच्या या द्वितीय पंतप्रधानांच्या जीवनावरील एका पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. लालबहादूर शास्त्री यांचा मुलगा अनिल शास्त्री आणि पवन चौधरी यांनी ‘लालबहादूर शास्त्री – लेसन्स इन् लीडरशिप’ असे शीर्षक असलेल्या या पुस्तकाचे लेखन केले आहे.
३ जानेवारी १९६६ ला पाकिस्तानचे तत्कालीन प्रमुख जनरल अयूब खान यांच्या भेटीस जात असलेल्या शास्त्रींकडे त्या वेळी लोकरीचा खादी कोट होता. रशियामध्ये जानेवारी महिन्यात प्रचंड थंडी असूनही शास्त्रीजी आपल्या नेहमीच्याच वेशभूषेत या भेटीसाठी गेले होते, अशी नोंद या पुस्तकात करण्यात आली आहे. शास्त्रीजी यांच्या अंगावरील कोट त्यांचे बोचऱ्या थंडीपासून रक्षण करू शकत नसल्याचे रशिया  प्रमुखांच्या लक्षात आले आणि त्यामुळेच शास्त्री यांना रशियन पद्धतीचा ओव्हरकोट भेट म्हणून द्यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र ही भेट कशी द्यावी, हे त्यांना उमगत नव्हते. त्यामुळे एका समारंभाचे औचित्य साधून त्यांनी ही भेट शास्त्रींना दिली. शास्त्रीजी ताश्कंद येथे तो कोट घालतील, अशी कोसिजीन यांना अपेक्षा होती.
प्रत्यक्षात काय झाले?
भारताच्या पंतप्रधानांनी ताश्कंद भेटीदरम्यान सदर कोट घातलाच नाही. अस्वस्थ झालेल्या कोसिजीन यांनी आपल्याला कोट आवडला नाही का, अशी विचारणा केली असता, शास्त्रीजी म्हणाले, ‘की कोट सुंदर आहे आणि मला आवडलादेखील. मात्र माझ्यासोबत आलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याकडे थंडीपासून बचाव करणारा चांगला कोट नसल्याने आपण सदर कोट त्याला तात्पुरता दिला आहे. मात्र यापुढे अत्यंत थंड हवामान असलेल्या देशांना आपण जेव्हा भेटी देऊ तेव्हा, तेव्हा मी आपल्या भेटीचा जरूर वापर करेन.’
कोसिजीन गहिवरले..
गरज आणि क्षमता यांची सांगड घालणारे आम्ही फक्त कम्युनिस्ट आहोत, लालबहादूर शास्त्री मात्र महाकम्युनिस्ट आहेत, अशा शब्दांत कोसिजीन यांनी शास्त्रींचा खुल्या मनाने गौरव केला.