25 January 2021

News Flash

खरोखरच वानरसेनेने बांधलेला राम सेतू?; सर्व रहस्यांवरुन पडदा उठणार, ASI समुद्राच्या तळाशी करणार संशोधन

या सेतूची अंदाजे लांबी ४८ किलोमीटर

फोटो सौजन्य (पीटीआय आणि विकिपिडिया कॉमन्स)

भारत आणि श्रीलंकेदरम्यान अरबी समुद्रामधील राम सेतू कधी आणि कसा बनवण्यात आला यासंदर्भातील उत्तरं शोधण्यासाठी आता भारतीय पुरातत्व खात्याकडून (एएसआय) संशोधन सुरु करण्यात येत आहे. या संशोधनाअंतर्गत यावर्षी राम सेतू असणाऱ्या परिसरामध्ये समुद्राच्या पाण्याखाली एक विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे. या संशोधनामुळे रामायणासंदर्भात माहिती मिळवण्यासही फायदा होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एएसआयच्या केंद्रीय सल्लागार समितीने सीएसआयआर- नॅशनल इन्स्टियूट ऑफ ओशनोग्राफीच्या (एनआयओ) संशोधनासंदर्भातील अर्जाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे आता या इन्स्टियूटमधील वैज्ञानिकांचा राम सेतूसंदर्भातील संशोधन सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकल्पाशी संबंधित संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार संशोधनामधून यापूर्वी कधीही समोर न आलेली बरीच माहिती नव्याने कळेल. राम सेतूसोबतच रामायणासंदर्भातील महत्वपूर्ण माहिती या संशोधनामधून मिळण्याची अपेक्षा संशोधकांना आहे. या संशोधनासाठी एनआयओकडून सिंधू संकल्प किंवा सिंधू साधना या जहाजांचा वापर केला जाण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या दोन्ही जहाजांचे वैशिष्ट्य म्हणजे ही दोन्ही जहाजे पाण्याच्या पातळीखाली ३५ ते ४० मीटरपर्यंतचे नमूने गोळा करु शकतात. या जहाजांच्या मदतीने अगदी समुद्राच्या तळापर्यंत या सेतूसंदर्भातील काही पुरावे किंवा इतर समुग्री सापडतेय का यासंदर्भात संशोधन केलं जाणार आहे. या संशोधनामधून राम सेतूच्या आजूबाजूला लोकवस्ती होती की नाही याबद्दलही माहिती हाती लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा- एकाच घराच्या पत्त्यावर १०२ मतदारांची नोंदणी; मतदार यादीमध्ये चमत्कारिक घोळ

मिळालेल्या माहितीनुसार राम सेतूसंदर्भातील या संशोधनामध्ये रेडियोमॅट्रिक आणि थर्मोल्यूमिनिसेन्स (टीएल) सारख्या डेटिंग म्हणजेच कालमापन करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. येथील पाण्यामध्ये असणाऱ्या शेवाळाचीही तपासणी केली जाणार आहे. या पाण्यामध्ये असणाऱ्या शेवाळ तसेच कोरल्समधील कॅल्शियम कार्बोनेटच्या प्रमाणावरुन राम सेतूच्या कालावधीचा अंदाज बांधण्यात मोठी मदत होणार आहे.

राम सेतू प्रकल्पाच्या संशोधनाला धार्मिक महत्वाबरोबरच राजकीय महत्वही आहे. रामसेतू मानवनिर्मित होता की नैसर्गिक याचा शोध घेण्यासंदर्भात वारंवार वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तींकडून मागणी केली जाते. भारतीय पुराणशास्त्रानुसार रामसेतू हा भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान असून तो रामाच्या वानरसेनेने श्रीलंकेत जाण्यासाठी बांधला होता. तोच हा पूल असल्याचे सांगण्यात येतं. हा पूल जवळवजळ ४८ किलोमीटर लांबीचा आहे. २००७ साली एएसआयने यासंदर्भातील कोणताही पुरुवा सध्या उपलब्ध नसल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांनंतर एएसआयने सर्वोच्च न्यायलयामध्ये सादर केलेलं हे प्रतिज्ञापत्र मागे घेतलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 3:01 pm

Web Title: when and how was ram setu formed asi oks research scsg 91
Next Stories
1 मृत नातेवाईकाच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरीचा समान अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2 उत्तर प्रदेशातील रुग्णालयामध्ये कुत्र्याची पिल्लं जन्माला येतात असं म्हणणाऱ्या ‘आप’च्या आमदाराला अटक
3 पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर निवडणूक बंदी घालण्याची मागणी; SC ने केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला पाठवली नोटीस
Just Now!
X