मोदी सरकारने गरिबांची धार्मिक पार्श्वभूमी लक्षात न घेता त्यांचे कल्याण सुनिश्चित केले असून, भाजप सत्तेवर असलेल्या राज्यांमध्ये एकही मोठी जातीय दंगल झालेली नाही, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

लोक कोणत्या धर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांचे कल्याण करण्यास आमचा पक्ष बांधील आहे, असे शहा यांनी भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात सांगितले. देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क असल्याचे सांगणाऱ्यांनी त्यांच्यासाठी काहीच केले नाही, अशी कोपरखळी त्यांनी काँग्रेसला उद्देशून मारली.

देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क असल्याचे काही लोक सांगत होते, मात्र त्यांनी या लोकांना हे हक्क दिले नाहीत. याउलट देशाच्या संसाधनांवर गरिबांचा पहिला हक्क असल्याचे आम्ही मानतो आणि सर्व गरिबांना त्यांच्या धर्माचा विचार न करता हे फायदे देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे निश्चित केले आहे, असे शहा म्हणाले.

अल्पसंख्याकांचे ‘लांगुलचालन’ करणाऱ्या लोकांनी जवळपास पाच दशके देशावर राज्य करूनही अल्पसंख्याक पिछाडीवर का राहिले, असा प्रश्न करून शहा यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. भाजप सत्तेवर आल्यास वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांना त्यांच्या परंपरांचे पालन करता येणार नाही अशी भ्रामक समजूत पसरवण्यात आली होती. मात्र भाजप आणि मोदी सरकारचा ‘सबका साथ, सबका विकास’ यावर विश्वास आहे, असे त्यांनी आवर्जून सागितले.

भाजपचा प्रमुख म्हणून मी हे अभिमानाने सांगू शकतो, की आज भाजप १६ राज्यांमध्ये सत्तेवर आहे आणि पक्षाच्या कार्यकाळात एकदेखील मोठी दंगल झालेली नाही. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बसप यांची सरकारे पायउतार झाली आणि दंगली संपल्या.  – अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप