देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आल्या की सर्जिकल स्ट्राईक करायचं हा आता मोदी सरकारचा पॅटर्न झाला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते अखिलेश सिंह यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून दहशतवादी कॅम्प उद्धवस्त करण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अखिलेश सिंह म्हणाले, जेव्हा देशात कुठल्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होत असतात तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करायचं हा मोदी सरकारचा पॅटर्न झाला आहे. याद्वारे सर्जिकल स्ट्राइकवरुन खऱ्या प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी राजकारण केले जात आहे.

पाकिस्तानचा घुसखोरांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न हाणून पाडताना भारतीय लष्कराने काल रात्रीपासून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी कॅम्पवर हल्ले सुरु केले आहेत. लष्कराने हे दहशतवादी कॅम्प उध्वस्त करण्यासाठी आर्टिलरी गनचा वापर केला आहे. तंगधार सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अनेक दहशतवाद्यांसह १० पाकिस्तानचे सैनिकही ठार झाल्याचे नुकतेच लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले आहे.