राफेल डीलप्रकरणी सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सुरुवातीला भाजपावाले जेव्हा माझं नाव घ्यायचे तेव्हा मला आश्चर्य वाटायचे, मात्र आता ही बाब सामान्य झाली आहे. भाजपावाले जेव्हा एखाद्या मुद्द्यावरुन अडचणीत येते तेव्हा ते माझे नाव घेतात, अशी प्रतिक्रिया वद्रा यांनी दिली आहे.


वद्रा म्हणाले, रुपयाचा दर घसरला, तेलाच्या वाढत्या किंमती किंवा राफेल प्रकरणातून देशाला विकून खाण्याचा प्रकार का असेना त्यात भाजपाला माझेच नाव दिसते. भाजपा आणि सध्याच्या सरकारला ही गोष्ट चांगली माहिती आहे की, गेल्या चार वर्षांपासून ते माझ्याविरोधात निराधार राजकारण करण्यात व्यस्त आहेत, अशा शब्दांत वद्रा यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

भाजपाने राफेल प्रकरणावरुन वद्रा यांच्यावर आरोप केल्यानंतर वद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने म्हटले होते की, युपीए सरकारला रॉबर्ट वद्रा आणि संजय भंडारी यांच्या कंपनीला राफेलचे कंत्राट द्यायचे होते. हे होऊ शकले नाही म्हणूनच काँग्रेस हा व्यवहार रद्द करुन त्याचा बदला घेऊ पाहत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमवारी हा आरोप केला होता.

मंगळवारी भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले होते की, राफेल डीलमध्ये वद्रा यांना दलाली मिळाली नाही त्यामुळे काँग्रेसने या व्यवहाराला पूर्ण होऊ दिले नाही. राफेल डीलमध्ये काँग्रेसला कमिशन खायला मिळाले नाही त्यासाठी काँग्रेस खवळली आहे. रॉबर्ट वद्रा यांचे मित्र संजय भंडारी यांची कंपनी ऑफसेट इंडिया सोल्युशनला २०१४ मध्ये मोदी सरकारने लाल झेंडा दाखवला. अन्यथा, काँग्रेस सरकार संरक्षण व्यवहारात दलाली करून देशाच्या सुरक्षेशी खेळत होते.