अॅपलचा बहुप्रतिक्षित ‘आयफोन ७’  आणि आयफोन ७ प्लस ही उत्पादने आज अमेरिकेत लाँच करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना या मोबाईल फोनबद्दल प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज ही उत्सुकता संपणार आहे. लाँच होण्यापूर्वीच या फोनसाठी मोठ्याप्रमाणावर आगाऊ नोंदणी करण्यात आली आहे. अॅपल नेहमीच आपल्या उत्पादनांच्या लाँचिंगबाबत सजग राहताना दिसून आली आहे. आयफोन ७ च्या लाँचिंग प्रक्रियेवरही स्वत: सीईओ टीम कूक नजर ठेवून असल्याचे समजते.
अॅपलच्या नव्या उत्पादनांची घोषणा दरवर्षी सप्टेंबरमध्येच केली जाते. सलग पाच वर्षे कंपनीकडून याच महिन्यात नव्या उत्पादनांबद्दल माहिती दिली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन ७ आतापर्यंतच्या आयफोनच्या मॉडेल्सपेक्षा अधिक स्लीम असेल. यासाठी नव्या मॉडेलमधून ऑडिओ जॅकही काढण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे ग्राहकांना वायरलेस हेडफोन्स घ्यावे लागू शकतात. यापेक्षा नव्या मॉडेलमध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला नाही. आयफोन ६ सारखेच नवे मॉडेल असेल, अशी माहिती मिळाली आहे. पाण्यापासून बचाव करण्यासाठी नवे मॉडेल अधिक सुसज्ज असेल, असेही समजते. १६ जीबीचे आयफोन मॉडेल बंद होईल, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. त्याप्रमाणे नवे मॉडेल हे १६ जीबीमध्ये उपलब्ध होणार नाही. नवे मॉडेल थेट ३२ जीबीमध्ये उपलब्ध असेल, अशीही माहिती मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्षात आयफोन ७ कसा असेल, हे लाँचिंग झाल्यानंतरच कळू शकेल.

आयफोन ७ कधी लाँच होणार?

७ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिको येथे आयफोन ७ लाँच होणार आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार आयफोन ७ किती वाजता लाँच होणार?

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०.३० वाजता आयफोन ७ च्या लाँचिंग सोहळ्याला सुरूवात होईल.

आयफोन ७ चे लाँचिंग कोणत्या टीव्ही चॅनेल्सवर लाईव्ह दाखवण्यात येणार?

जगभरातील अनेक तंत्रप्रेमींमध्ये या सोहळ्याबद्दल उत्सुकता असल्याने वृत्तवाहिन्यांवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येण्याची शक्यता आहे.

आयफोन ७ चे लाँचिंग ऑनलाईन स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

अॅपलकडून महत्त्वपूर्ण उत्पादनांच्या लाँचिंग सोहळ्याचे नेहमीच थेट प्रक्षेपण करण्यात येते. यावेळीही अॅपलच्या अधिकृत संकेतस्थळावर या सोहळ्याचे प्रक्षेपण पाहता येईल. याशिवाय, ज्यांच्याकडे आयफोन आणि आयपॅड असणाऱ्यांना सफारी या ब्राऊझरच्या माध्यमातून लाँचिंग सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. विंडोज वापरकर्त्यांना विंडोज १०मध्ये मायक्रोसॉफ्ट एज असल्यावरच हे प्रक्षेपण पाहता येईल.

आयफोन ७ चे लाँचिंग कुठे होणार आहे?

सॅनफ्रान्सिस्को येथील बिल ग्रॅहम सिव्हिक ऑडिटोरियमध्ये आयफोन ७ चा लाँचिंग सोहळा पार पडेल. बिल ग्रॅहम ऑडिटोरियमध्ये एकावेळी सात हजार प्रेक्षक बसू शकतात. या सोहळ्याला पत्रकार, विश्लेषक आणि अॅपलचे विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अॅपल कंपनीतील कोणती व्यक्ती आयफोन ७ चे सादरीकरण करणार?

सूत्रांच्या माहितीनुसार अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कूक यांच्या हस्ते आयफोन ७ चे सादरीकरण करण्यात येईल.